जगातील पहिलं गोल्ड प्लेटेड हॉटेल

गोल्डपासून तयार करण्यात आलेलं हे जगातील पहिलं हॉटेल असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Updated: Jul 4, 2020, 04:02 PM IST
जगातील पहिलं गोल्ड प्लेटेड हॉटेल

हनोई : कोरोना व्हायरसच्या संकट काळात व्हियेतनाम येथील हनोईमध्ये महागडं, शाही हॉटेल सुरु झालं आहे. या हॉटेलमधील रुमपासून ते वॉशरुमपर्यंत सर्व गोल्ड प्लेटेड असल्याचं बोललं जात आहे. येथे राहण्यासाठी एका रात्रीची किंमत 250 डॉलर इतकी आहे.

जगभरात कोरोनाचं संकट असताना व्हियेतनाममध्ये मात्र गोल्ड प्लेटपासून बनवलेलं एक हॉटेल खुलं करण्यात आलं आहे. गोल्डपासून तयार करण्यात आलेलं हे जगातील पहिलं हॉटेल असल्याचा दावा करण्यात आला आहे.

'डोल्स हनोई गोल्डन लेक' नाव असलेल्या या हॉटेलची लॉबी 24 कॅरेट गोल्डपासून तयार करण्यात आली आहे. यासाठी जवळपास 200 मिलियन डॉलर खर्च करण्यात आला आहे. एवढंच नाही तर हॉटेलमधील पुल, रुम, भांडी-कप-प्लेट, टॉयलेटही गोल्डपासून तयार करण्यात आलं आहे. पाहुण्यांसाठी कॉफी सोन्याच्या कपमध्ये दिली जाते. 

हनोईच्या मधोमध असलेल्या या 25 मजली हॉटेलमधून शहराचा संपूर्ण नजारा पाहता येतो. या हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या जेवणातही खास प्रकारचं गोल्ड मिसळलं जात असल्याचं बोललं जात आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांना हॉटेलचा हा शाही अंदाज पसंत पडतो आहे.

Gilty pleasure
फोटो सौजन्य : WION

हॉटेलचे चेअरमन हू दोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ग्रुपमधील एका फॅक्टरीमध्ये गोल्ड प्लेट बनवण्याचं काम केलं जातं. त्यामुळे त्यांना हॉटेलसाठी फर्निचर आणि इतर वस्तू बनवण्यासाठी कमी खर्च आल्याचं सांगण्यात आलं. पुढील वर्षात हॉटेल जबरदस्त कमाई करेल असा विश्वासही हॉटेल मालकांनी व्यक्त केला आहे.