विशाल सवने, झी मीडिया
Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Ceremony : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूतून पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. पालखीचा कालचा मुक्काम देहूतल्या इनामदारवाड्यात होता. यावर्षीचा हा 338 वा पालखी सोहळा आहे. पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. यासाठी देहूमध्ये मोठ्या संख्येनं वारकरी दाखल झाले.
- सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे स्पर्श
- सकाळी नऊ ते अकरा दरम्यान मंदिराच्या विना मंडपात कीर्तन होईल
- दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता होईल त्यानंतर समाधीस पाणी घालणे आणि महानैवेद्य दाखवण्यात येईल
- दुपारी साडेबारा ते एक दरम्यान भाविकांना समाधीचे दर्शन हे सुरूच राहील.
- दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत मानाच्या 47 दिंड्यांना मंदिर प परिसरात प्रवेश दिला जाईल याच दरम्यान संजीवन समाधी मंदिरात श्रींचा पोशाख देखील केला जाईल.
- सायंकाळी चार नंतर पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल तो खालील प्रमाणे असेल तसेच श्री गुरु हैबतबाबा यांचेतर्फे आरती होईल. त्यानंतर संस्थानातर्फे श्रींची आरती होईल. त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळाचा प्रसाद दिला जाईल . त्यानंतर विना मंडपात असणाऱ्या पालखीमध्ये श्रींच्या चलपादुकांना प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
संत निवृत्ती महाराजांची पालखी अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे. राहता तालुक्यातील लोणी इथून पालखीने मार्गक्रमण केलं. हजारोंच्या संख्येने वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेत. विठुरायाला भेटण्यासाठी भर उन्हातही वारकरी पंढरपुरकडे मार्गक्रमण करताहेत.
ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मगाव असलेल्या पैठणच्या आपेगावमधूनही दिंडीनं पंढरपूरकडे प्रयाण केलं आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या चारी भावंडांचा जन्म याच ठिकाणी झाला होता. त्या ठिकाणी माऊलींचं भव्य मंदिर बांधण्यात आलंय. कित्येक वर्षांच्या परंपरेनुसार ज्ञानोबा माऊलींच्या आईवडिलांची वारी या ठिकाणावरुन निघते.
मानाच्या दहा पालख्यांपैकी एक असलेली एकनाथ महाराजांची पालखी पैठण समाधी मंदिरातून निघाली. गोदावरी काठी पोहोचलेल्या या पालखीनं इथेच पहिला विसावा घेतला आहे. तिथून ही पालखी पंढरपूरला रवाना होणार आहे.. मोठ्या संख्येनं वारकरी यात सहभागी झालेत.. 425 वर्षांचा इतिहास असलेली ही पालखी तब्बल 19 दिवसांचा प्रवास करून पंढरीत पोहोचेल.
नाशिकच्या दोन भाविकांनी पंढरपूरच्या विठुरायाला चांदीचा मुकूट अर्पण केलाय. मुकुटावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलंय. हा मुकूट दीड किलो वजनाचा असून, या मुकुटाची किंमत 93 हजार इतकी आहे.