Ashadhi Ekadashi : संपूर्ण महाराष्ट्राला ज्या सोहळ्याची सर्वाधिक उत्सुकता असते तो सोहळा म्हणजे आनंदवारी. जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा 338 वा पालखी सोहळा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला प्रस्थान सोहळा सुरु होईल. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली.
पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिरात अभिषेक झाला. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती करून सुरूवात करण्यात आली. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधीवत पूजेनंतर तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांच्या पादुकांचा अभिषेक करून विधीवत पूजा करण्यात आली. 28 जूनला पंढरपूरला तुकाराम महाराजांची पालखी दाखल होईल. येथे 19 दिवसांचा प्रवास करुन पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे.
रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार 12 जूनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार 13 जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल.
बुधवार 14 जून लोणीकाळभोर, गुरुवार 15 जूनला यवत, शुक्रवार 16 जून वरवंड, शनिवार 17 जून उंडवडी गवळ्याची, रविवार जून जुन बारामती, सोमवार 19 जून सणसर, मंगळवार 20 जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, बुधवार 21 जून निमगाव केतकी, गुरूवार 22 जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शुक्रवार 23 जून सराटी, शनिवार 24 जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि (Dehu) रात्रीचा मुक्काम अकलुज येथे होईल.
रविवार 25 जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार 26 जून रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल. मंगळवार 27 जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल.
दरम्यान, पालखी मार्गावरसुविधा मिळाव्यात , त्याबाबतच्या जबाबदाऱ्या असणाऱ्या व्यक्तींशी आज भेटलो. आवश्यक सूचना करुन कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम रवींद्र चव्हाण यांनी दिली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्य विभागातर्फे 52 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आजपासून सुरु होत आहे. त्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागाकडून उपाययोजना आखण्याचे काम सध्या सुरु आहे. राज्य भरातून येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या पाहता देहू आरोग्य विभागाकडून देखील नियोजन करण्यात येत आहे. वारीसाठी देहू मंदिर परिसर आणि संपूर्ण देहूत असणाऱ्या हॉटेल मध्ये तपासणी केली जात आहे.
हॉटेलमध्ये असणाऱ्या पाण्याचे नमुने रोजच्या रोज आरोग्य विभागाकडून घेऊन तपासण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे हॉटेल, टपरी मध्ये विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ यांची देखील तपासणी करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. तर दुसरीकडे वारी सोहळ्यासाठी एकूण 52 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या काळात प्राथमिक आरोग्य केन्द्रासह तीन ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्र ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती प्राथमिक देहू आरोग्य केद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर यादव यांनी दिली.