म्हणून निवडणूक न लढवता बाळासाहेबांचा 'शब्द' 'आदेश' असायचा

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. पण तरीही बाळासाहेबांचा 'शब्द' हा सर्व शिवसैनिकांसाठी 'आदेश' असायचा.

Updated: Oct 3, 2019, 06:47 PM IST
म्हणून निवडणूक न लढवता बाळासाहेबांचा 'शब्द' 'आदेश' असायचा title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. पण तरीही बाळासाहेबांचा 'शब्द' हा सर्व शिवसैनिकांसाठी 'आदेश' असायचा. कारण बाळासाहेबांनी सर्वांनाच मोठं केलं, या नात्यामुळे सर्व त्यांचा आदेश पाळायचे. त्यांनी सर्वांना मोठं केल आणि करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आजही ते शिवसैनिक आणि शिवसेना नेत्यांसाठी सर्वोच्च स्थानी आहेत.

बाळासाहेब राजकारणात असले, तरी निवडणूक त्यांनी कधीच लढवली नाही. सत्तासुंदरीचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठ मोठ्या नेत्यांनी काय-काय नाही केलं. पण बाळासाहेबांनी सत्ता आपल्या माणसांच्या हाती सोपवली. ती त्यांच्याकडून चालवून घेतली.

कदाचित मंत्रिमंडळाच्या त्या बैठका, बाबूशाहीला तोंड देणं, फाईलींचा तगादा, आरोप-प्रत्यारोप, तरतूदी आणि बजेट या वातावरणात बाळासाहेबांचं मनही लागलं नसतं. तरी देखील यातील काही महत्वाची योग्य, आवश्यक कामं त्यांनी आपल्या लोकांकडून करून घेतली.

यातही काही तक्रारी आल्यावर बाळासाहेबांनी शहानिशा करून त्यात सुधारणा केल्या. सरकार चालवताना, सरकार व्यवस्थित चालतंय ना एवढंच बाळासाहेबांनी लक्ष ठेवलं. त्यातही अनेकांना वाईट काळात साथही दिली.

कदाचित बाळासाहेबांनी निवडणूक लढवली असती, पदं भूषवली असती, तर त्यांच्यातला आतला कलाकार आणि मित्रांमध्ये रमण्याचे ते क्षण त्यांनी ताणतणावात घालवले असते.

बाळासाहेबांची मैत्री ही सर्वच क्षेत्रातील मान्यवरांशी होती. यात अनेक सर्वसामान्य कलाकार देखील होते. ताणतणावाला जवळ न येऊ देणारे ते राजकारणी असावेत. पदापासून दूर राहिल्याने सर्वांना वेसण घालण्याची क्षमता त्यांच्यात अधिक होती, आणि सर्व गोष्टींचे नाथ-दोरे त्यांच्या हाती होते.

शिवसेना सोडून गेलेल्या आणि आपल्या मुळे पदं मिळवून आजी माजी झालेल्या नेत्यांनाही बाळासाहेबांनी अचानक फोन करून, 'बरा आहेस ना रे बाबा', असं म्हणून विचारपूस केली आहे. पण बाळासाहेब कुणाच्या पदावर नजर ठेवली नाही, शिवसैनिकांमुळे महत्वाचं ठरलेलं शिवसेनाप्रमुख पद हे त्यांच्यासाठी सर्वोच्च होतं.

मुख्यमंत्रीपदाची त्यांना कधीच भुरळ पडली नाही,  म्हणून प्रत्यक्षात बाळासाहेबांवर आरोप झाले, असं क्षण त्यांच्या आयुष्यात फार कमी वेळेस आले, भ्रष्टाचाराचे आरोप तर त्यांच्यापासून लांबच लांब होते.

शिवसेना युतीचं पहिल्यांदा सरकार आलं, तेव्हा त्यांना सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणण्यात आलं. तरी असं असूनही एक राजकारणी, किती प्रत्यक्ष पद न भोगता, राज्याची सत्ता सांभाळून किती आनंदात राहू शकतो, या मागचा आनंद बाळासाहेबांनाच माहित असेल.

उद्धव ठाकरेंनीही कधी निवडणूक लढवली नाही, पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे आता पिढी बदलतेय. आदित्य हे निवडणूक लढणारे पहिले ठाकरे ठरले आहेत, पण त्यांनी हा ताणतणाव जवळपास न येऊ देता, सदैव आनंदी आणि सर्व क्षेत्रातले मित्र कसे जोडता येतात, याबाबतीत नक्कीच बाळासाहेबांचा आदर्श ठेवावा.