प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस म्हणजे जणू उत्सव असतो .वर्षभर लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र सांगीतिक उत्सव साजरा होतोय. दीदी आता ९१ व्या वर्षात पदार्पण केले आहे... लता मंगेशकर... गाण कोकीळा... स्वरसंम्राज्ञी...गानसरस्वती...अशी विविधांगी ओळख एकाच गायिकेला मिळण्याचं भाग्य कदाचित जगातलं हे एकमेव नाव असेल ..
लता दीदींचा जन्म इंदौरचा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची कन्या ते भारतरत्न लता मंगेशकर ..इथपर्यतचा हा प्रवास कुणालाही हेवा वाटावा असाच आहे.. वयाच्या अवघ्या १३-१४व्या वर्षी वडिल मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच निधन झालं.. आणि घरातली मोठी बहिण म्हणून लता दीदींना भावंडांची आणि आईची जबाबदारी घ्यावी लागली. मग घरात आर्थिक पाठबळ देण्यासाठी मिळेल ते काम करण्याचं लता दीदींनी ठरवल.
अगदी सुरुवातीला १९४२च्या सुमारास पहिली मंगळागौर, चिमुकला संसार, बडी मॉं, जीवनयात्रा, छत्रपती अशा काही चित्रपटांतून पडद्यावर भूमिकाही केल्या. अर्थातच सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा होता. मात्र आवाजातच अशी काही जादू होती की या सात्विक आवाजापुढे संघर्षालाही नमतं घ्यावं लागलं.
एकामागून एक गाणी मिळत गेली. त्या गाण्यांना लता दीदींचा स्वरसाज अधिक फुलवत गेला. संगीतकारांसाठी लता दीदी म्हणजे जणू अमृत स्वरांचा खजिनाच ठरू लागला.पिढ्या बदलल्या, नाईका बदलल्या मात्र लता दीदींचा आवाज नव्या नाईकांनाही तितकाचं शोभून दिसला. मग ते मधुबालासाठी गाणं असो की थेट पुढच्या पिढीतील माधुरी दिक्षीत, ऐश्वर्या राय, काजोल असो.. दीदींचा आवाज त्या नाईकेच्या वयाचाच बनला.
लता दीदींचे चाहते फक्त सर्वसामान्य रसिकच आहेत असं नाही तर अनेक कलाकारही दीदींचे निस्सीम चाहते आहेत. दीदींचा स्वर म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंद म्हणतात तो हाच का? असं म्हणत दीदींच्या स्वरांना अनेकजण सलाम करतात. गणपतीची आरती असो की वेदवेदशी स्तोत्रं असो. दीदींच्या आवाजाने त्यातली सात्विकता अधिक भावून जाते.
महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, पद्मवीभूषण ते भारतरत्न अशा अनेक पुरस्कारांनी लता दीदींचा गौरव करण्यात आलाय. आजही अनेक घरांमध्ये लता दीदींच्या सुरांनी दिवसाची मंगलमय सकाळ होते.. हीच या सुरांची ताकद आहे. हिच या सुरांची जादू आहे.हाच या सुरांचा आनंददायी ठेवा आहे.दीदी तुम्ही ९१ व्या वर्षात प्रवास करताय...हा सुरेल प्रवास असाच सुरू राहो याच शुभेच्छा ...