मध्य रात्री तितक्यात कुणीतरी हंबरडा फोडला...सगळं संपलं

शुक्रवारी मध्यरात्री भंडाऱ्यात (Fire at Bhandara District Government Hospital) घडलेल्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले, फायर ऑडीटबाबत, प्रशासनाबद्दल, दुर्लक्षाबद्दल... पण या सगळ्यात त्या बाळाच्या आईचं काय... तिची घालमेल... तिची अवस्था....

सुवर्णा धानोरकर | Updated: Jan 9, 2021, 09:17 PM IST
मध्य रात्री तितक्यात कुणीतरी हंबरडा फोडला...सगळं संपलं title=

मुंबई : शुक्रवारी मध्यरात्री भंडाऱ्यात (Fire at Bhandara District Government Hospital) घडलेल्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले, फायर ऑडीटबाबत, प्रशासनाबद्दल, दुर्लक्षाबद्दल... पण या सगळ्यात त्या बाळाच्या आईचं काय... तिची घालमेल... तिची अवस्था मांडतायत 'झी 24 तास'च्या अँकर / प्रोड्युसर सुवर्णा धानोरकर. (Suvarna Dhanorkar's blog)

न्यॅहsss न्यॅहsss
              थोडं अंधारलंय. आसपास बायाबापड्यांची ये-जा सुरुय. ती शांत आहे. कुणी तिच्याजवळ बसतंय. तिच्याकडे बघतंय. मध्येच तिचा हात हातात घेतंय. मध्येच तिच्या पाठीवरून हात फिरवतंय. बोलायला तोंड उघडावं तर पार पोटापर्यंत कोरड पडलीय असं वाटतंय. मग न बोलताच उठून निघून जातायत. तरीही ती शांतच. तिच्या आसपास काय घडतंय याच्याशी तिचा संबंधच नाही अशी ती बसलीय. अचानक तिची चलबिचल झाली. तिची नजर शोधत होती कुणालातरी. 'आव! दवाखान्यात जा लागते.' तो अचंबित. 'बालीले भूक लागली वाट्टे. मले तरास हुन रायला. चाला न.'

तितक्यात कुणीतरी हंबरडा फोडला आणि ती पुन्हा भानावर आली. होत्याच नव्हतं झालं. सगळं संपल्यागत झालं. काही तास आधीपर्यंत तिच्या पान्ह्याची आस होती, तिला भरून यायचं. अख्खं ब्लाऊज ओलं व्हायचं. पदर ओला व्हायचा. पण तिला आनंद व्हायचा. आज तो आनंद दूरदूर निघून गेलाय. तो पान्हा वाया जातोय. कोरडा होईल तो. पण मनाची कोरड कधी संपेल. कुस उजवेल तिची पुन्हा, पण या भळभळत्या कुशीचं काय... ही कुस एका क्षणात हलकी झाली. हातात फक्त राख राहिली. ती मुठीत जपावी, की गंगेत सोडावी...

टीव्हीचा आवाज आला, 'याची चौकशी व्हायला हवी... दोषींना शिक्षा झालीच पाहिजे... पीडित कुटुंबांना 5 लाखाची मदत आम्ही जिहाधिकाऱ्यांमार्फत उद्याच देत आहोत... तिला काही दिसेनासं झालं. डोळ्यातून घळा घळा अश्रू व्हायला लागले. रडू की हसू? आजवर बाळ होणार म्हणून पै पै साठवली त्याच्यासाठी, आणि आज 5 लाख मिळतायत. पण बाळच नाही. काय करू या पैशांचं? कुणासाठी ठेऊ? लंगोट, दुपटी अडकवण्यासाठी आणलेला गोल हँगर कोपऱ्यात सुन्न पडला होता. दुपट्यांची थैली शांत होती. बाजुचा डिंकाच्या लाडवाचा डबा कडू झाला होता. साजूक तूप काळवंडलं होतं. अंगाला लावायचं तेलं थिजलं होतं.  हळूच इवलासा उंदीर बाजूच्या डायपरच्या पाकिटावर गेला. ती तडक उठली उंदराला पळवलं. डायपरचं पाकीट छातीशी घट्ट् धरलं. ते पाकीट उघडावच लागलं नाही. कारण तिची लेक घरी आलीच नाही. दहा बारा दिवसांपूर्वी सगळे आनंदाने म्हणत होते 'पोरी, लक्ष्मी जन्माला आली तुझ्यापोटी.' उद्या हातात लक्ष्मी कागदाच्या रुपात येणारय. इवल्या इवल्या पावलांची गोबऱ्या गोबऱ्या गालांची, इवल्याश्या नाकाच्या लक्ष्मीची रात्रीच राख झाली. तिच्या जन्माची जखम आहे. तिच्यासाठी फुटलेला पान्हा आहे. तिनं जन्माआधी पोटावर ओरबाडायला लावलेलं स्ट्रेच मार्क्स आहेत. पोटाला बांधलेल्या लुगड्याचा वळ आहे. आंगडीटोपडी आहे. लंगोटा आहेत. सगळं तुझी वाट पाहत होतं. तू येशील, मग तुझ्या आवाजानं सगळं आनंदी होईल म्हणून तुझी वाट पाहत होते... पण तू आलीच नाही. तुझी बातमीच आली मध्यरात्री... काळोख्या रात्रीच तू न सांगता निघून गेली.

डोळ्यांवर झापड आली. म्हणून जरा अंग टेकलं. मिटल्या डोळ्यांमध्ये तूच होती. नाजूकशी, किलो-दीड किलोची. गुलाबी रंगाची. दुधासाठी न्यॅह न्यॅह करणारी. हाता पायाला सलाईनच्या पट्ट्या लावलेली. हळूच डोळे किलकिले करणारी. इवल्याशा ओठांनी जांभई देणारी. जांभई देताना अंगाची हालचाल करणारी. तोंडातली टिचभर जीभ दाखवणारी बाली कुठे गेली... तू पुन्हा येशील माहितीय, पण तोवर हा पान्हा कोणासाठी... तू गेली म्हणून कोणाला  दोष देऊ... दोष देऊन तू येणार का.... नाही. मग काय करू... तुला पाहताही आलं नाही.  तू पुन्हा येशील माहितीय.. तोवर हा पान्हा तुझ्या इवल्याशा ओठांसाठी आसुसलेला राहील... तुझ्यासाठी हा पान्हा भुकेला राहील... न्यॅह न्यॅह करेल.

SOCIAL MEDIA ACCOUNTS:
TWITTER: @suvarnayb
FACEBOOK: /suvarnamdhanorkar
INSTAGRAM: /suvarnadhanorkar