पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यातून आपण काय शिकायला हवं ?

आपल्या कळत नकळत आपण दहशतवाद्यांच्या हेतूंना खतपाणी तर घालत नाही ना ? याचा विचार करायला हवा. 

Updated: Feb 15, 2019, 12:11 PM IST
पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यातून आपण काय शिकायला हवं ?  title=

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई :  पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे 44 जवान शहीद झाले. पुलवामाचा हल्ला हा उरी हल्ल्यापेक्षाही कितीतरी पटीने भयानक होता. उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने दहशतवाद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात आले होते. पण त्यानंतरही पुलवामामध्ये लष्कराच्या गाडीवरच कारमधून येऊन आत्मघातकी हल्ला करण्याचा निंदनीय प्रकार घडला. त्यानंतर जे झालं त्याला देश सामोरा जात आहे. या घटनेनंतर देशभरात संताप उसळला आहे. दहशतवाद्यांबद्दल इथे प्रत्येकाच्याच मनात राग आहे. जो सोशल मीडियावर व्यक्त होतोय. आपल्या सर्वांचे दु:ख यावेळेस सारखेच आहे. या हल्ल्यात भारताने जे काही गमावले आहे त्याचे मोजमाप कधीच होऊ शकणार नाही. हा राग स्वाभाविक आहे पण राजकारणी, माध्यम, सामान्य नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाची भूमिका इथे महत्त्वाची ठरते. कारण आपल्या कळत नकळत आपण दहशतवाद्यांच्या हेतूंना खतपाणी तर घालत नाही ना ? याचा विचार करायला हवा. हा प्रत्येक हल्ला आपल्याला काही समज देऊन जातो. त्यातून आपण प्रत्येकाने वेळीच धडा घ्यायला हवा. 

उरी सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर प्रत्येक हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइकच करा असे आवाहन सोशल मीडियातून आवाहन केले जाते. पण प्रत्येक हल्ल्याचे उत्तर हे सर्जिकल स्ट्राईक हेच नसते. आता तर पुलवामा हल्ल्यास जबाबदार असलेले दहशतवादीही भारताकडून होणाऱ्या सर्जिकल स्ट्राइकसाठी सज्ज असतील. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा वेगळ्या मार्गांवरही विचार करु शकते. 

आपण या सगळ्या घटनेला कोणत्या समजूतदारीने घेतो यावरही सर्वकाही अवलंबून आहे. देशाअंतर्गत उगीच कोणावरही आरोप-प्रत्यारोप करुन विषयापासून भरकटायला नको. देशावर कोणताही हल्ला झाला की एखाद्या धर्माला टार्गेट केलं जातं. त्यातून पुढे जातीय दंगे उफाळतात. दहशतवाद्याला कोणताच धर्म नसतो. त्यामुळे त्याच्या दुष्कृत्याला आपण धर्माच्या रंगात पाहून मोठी चूक करतो. देशभरातील धार्मिक दंगली झाल्यास दहशतवादी हल्ल्याहून वातावरण गंभीर होईल हे हल्लेखोरांना माहीत आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माला लक्ष्य करण्यापेक्षा दहशतवादालाच लक्ष्य करायला हवे. 

देशभरात निवडणूका काही महिन्यांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. ही टीका किती खालच्या पातळीवर असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण जेव्हा विषय देशाचा येतो तेव्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र यायला हवे. आपला शत्रू दहशतवाद आहे हे लक्षात ठेवायला हवे. 

माध्यमांमधून सामान्य नागरिकांना बातमी कळत असते. त्यामुळे माध्यमांची भूमिका या सर्वात महत्त्वाची असते. अशावेळी लोकांच्या भावना उफाळून निष्पापांचे जीव जातील अशा प्रकारच्या बातम्या न दाखवणे. दहशतवाद्यांना मदत होईल अशा बातम्या टाळणे हे माध्यमांच्या हातात असते. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारतर्फे माध्यमांनाही तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

'दहशतवादी काश्मिरातील ज्या घरात लपले असतील ते घर जाळून टाका', वैगेरे सारखी जहाल विधान करणाऱे व्हिडीओही वायरल होत आहेत. पण प्रत्येक काश्मीरी पाकिस्तानला सहकार्य करत नाही. पण निष्पापांचे बळी जाणार नाहीत आणि दहशतवाद्यांचाही खात्मा होईल यासाठी सुरक्षा यंत्रणा काम करत असते. त्यांच्या कामात अडथळा येईल अशी विधाने टाळायला हवीत. 

पाकच्या लोकांना उपाशी मारुन, त्यांचे पाणी रोखून, थेट युद्ध पुकारुन पाकिस्तान वठणीवर येऊ शकतो असेही काहींना वाटते. अशा पोस्ट सोशल मीडियात पाहायला मिळतात. पण दहशतवाद्यांनाही नेमके हेच हवे आहे. ज्यामुळे ते पाकिस्तानच्या जनतेलाही भारताविरुद्ध भडकवू शकतील. त्यांना तसे करण्यास अधिक बळ मिळेल. हा विचार देखील करायला हवा. त्यामुळे दहशतवादी पाक आपण दहशतवादाचा बदला आपण निष्पान नागरिकांना त्रास न देता दहशतवाद्यांवरच हल्ला करुन देतो हे आपण सर्जिकल स्ट्राईकने जगाला दाखवून दिले आहे.

काय व्हायला हवे ? 

केंद्र सरकारने नुकतेच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'पाक'चा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवरही परिणाम होणार आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतेय ती पुन्हा उचलून धरायला हवी. पाकिस्तानवर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक, इंडस्ट्रियल सर्जिकल स्ट्राईक करता येईल का ?  याचा विचार देखील देश करु शकतो.