close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मनालीतला अजित...

  खरं तर प्रवाहाच्या विरूद्ध पोहोणारे तरूण खरे धाडसी असतात. अर्थात हे धाडस दाखवताना तुम्हाला सर्वस्व पणाला लावावं लागतं, प्रसंगी तुमचा जीवही... तरीही हे धाडस करणारे अनेक आहेत आणि त्यात ते यशही मिळवून दाखवतात. मराठी माणूस देशाटन करायला नेहमीच उत्सुक असतो. पण अन्य राज्यात जाऊन धंदा सुरू करणे आणि तो टिकवणे याची उत्सुकता मराठी माणसाला फारशी नसते. पण काही अपवाद असतात आणि तेच नेमके प्रवाहाच्या विरूद्ध जाण्याचं धाडस दाखवतात. 

Updated: Oct 29, 2017, 01:24 PM IST
मनालीतला अजित...

अमित भिडे, झी मीडिया, मुंबई :  खरं तर प्रवाहाच्या विरूद्ध पोहोणारे तरूण खरे धाडसी असतात. अर्थात हे धाडस दाखवताना तुम्हाला सर्वस्व पणाला लावावं लागतं, प्रसंगी तुमचा जीवही... तरीही हे धाडस करणारे अनेक आहेत आणि त्यात ते यशही मिळवून दाखवतात. मराठी माणूस देशाटन करायला नेहमीच उत्सुक असतो. पण अन्य राज्यात जाऊन धंदा सुरू करणे आणि तो टिकवणे याची उत्सुकता मराठी माणसाला फारशी नसते. पण काही अपवाद असतात आणि तेच नेमके प्रवाहाच्या विरूद्ध जाण्याचं धाडस दाखवतात. 

हिमाचल प्रदेशातलं थंड हवेचं सुंदर ठिकाण मनाली... या मनालीत राहतो असाच एक धाडसी तरुण. धाडसी या शब्दाला साजेशी शरीरयष्टी त्याची मुळीच नाही. साडेपाच फूट उंची, किरकोळ बांधा, गोरापान वर्ण, बोलण्यात सांगलीचा गोडसा हेल असलेला असा अजित शिंदे. मनालीत अजित शिंदे यांचं सुंदरसं छोटेखानी दुकान आहे. दुकानाचं नावही प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानानं फुलेल असंच... पठ्ठ्याने हिमालयाच्या कुशीत उघडलेल्या या दुकानाला नाव दिलंय 'द मराठा टी शर्ट शॉप'.

मनालीतलं हिडिंबा मातेचं मंदिर हे जगप्रसिद्ध. मनालीत जाणारा प्रत्येक पर्यटक या मंदिरात जातो. त्याच मंदिराच्या बाहेर पाय-या उतरून खाली आलं की शिवाजी महाराजांचा फोटो असलेला फलक आपलं लक्ष वेधून घेतो. शिवरायांचा आणि भवानी मातेचा फोटो, वर जय माँ हिडींबा असं लिहून खाली 'द मराठा टी शर्ट शॉप' आणि खाली फर्राटेदार अक्षरात अजित शिंदे असं लिहिलेला हा फलक पाहिला की महाराष्ट्रातून आलेला प्रत्येक जण या दुकानात शिरलाच पाहिजे. हा फलक दिसण्याआधी नेमकं मी आणि माझी पत्नी याच विषयावर बोलत होतो की मनालीत कोणी मराठी व्यक्ती स्थायिक झालीय की नाही. हे आमचं बोलून होतं न होतं तोवर हे दुकान दिसलं... दुकान पाहिल्या क्षणी मी आत शिरलो... अजितने तातडीने स्वागत केलं. मनालीत महाराष्ट्रातून आलेल्या प्रत्येकाला अजित आपुलकीने भेटतो. त्यांच्याशी गप्पा मारतो... मनालीबाबत माहिती देतो, एखादा टी शर्ट पाहा असंही म्हणतो पण आग्रह करत नाही. 

अजित हा मुळचा मिरजेचा... २००९ मध्ये पोटापाण्यासाठी तो घराबाहेर पडला. पोटापाण्याचे उद्योग तुम्हाला कुठे घेऊन जातील सांगता येत नाही. अजित ज्या सांगली जिल्ह्यातून आला तिथल्या अनेकांचा हा प्रवास पुणे मुंबई मार्गे अगदी परदेशापर्यंत होत असेल. पण अजितला नियतीने नेलं थेट मनालीत. मनालीतल्या एका कपड्याच्या दुकानात तो कामावर आला. २००९ ते २०१३ या कालावधीत त्याने दुकानात नोकरी केली. धंद्यातले बारकावे तो इथेच शिकला. कृष्णामाईच्या प्रांतातल्या या तरूणाकडे धाडसी वृत्ती होतीच. 

२०१३ मध्ये अजितने मोक्याची जागा बघून सरळ स्वतःचं दुकान सुरू केलं. आज चार वर्षे तो हे दुकान चालवतो आहे. खूप प्रकारची व्हरायटी त्याच्याकडे आहे. धंद्यासाठी अगदी आवश्यक असलेली गोड भाषाही आहे. मनालीत काम केल्यामुळे बर्फाशी मैत्री झालीच आहे. तो बर्फ धंद्यासाठी डोक्यावर ठेवण्याची हातोटीही प्राप्त झालीय. त्यामुळेच अजित स्वतः व्यवसाय सांभाळू शकतोय.
 
अजित मनालीत एकटा राहतो. आईवडील मिरजेत आहेत. अजून दोनाचे चार व्हायचेत; त्यासाठी शोधही सुरू आहे. मनालीची हवा मिरजेपेक्षा अगदी वेगळी... इथे प्रचंड थंडी. थंडीत इथे कमरेएवढं बर्फ साठतं, लोक वेगळे, मुलुख वेगळा, या सगळ्याशी जमवून कसं घेतलंस या प्रश्नावर तो फक्त छानसा हसतो... त्याचं तत्त्व एकच... "दादा मला कोणतंही व्यसन नाही, आपण बरं आपलं काम बरं, इतर कोणत्याही प्रकरणात नाक खुपसायला मला आवडत नाही, त्यामुळे स्थानिकांशी कधी वाद झाले नाहीत. वाद नाहीत त्यामुळे स्थानिकांनाही माझा त्रास नाही. हवेचं म्हणाल तर धंद्यासाठी इथे राहायचं तर या सगळ्याशी जमवून घेतलंच पाहीजे की..." 

मिरजेची आठवण येतेच, पण मनालीने खुपच सांभाळल्याचं तो म्हणतो... मनालीवर त्याचं प्रेम आहे... त्याचमुळे जीवनात खरी 'मनाली' सहचारिणी म्हणून आली की तिला थेट मनालीतच घेऊन येण्याचा त्याचा इरादा आहे... अजितला जाता जाता एक प्रश्न विचारला... फलकावर शिवरायांचा फोटो मस्त लावलायस... त्यावर या मर्दाचं उत्तर... दादा तेच तर या सगळ्याचं मूळ आहेत ना !   

मनालीत भेट देण्यासारखी खूप सुंदर स्थळं आहेत. पण महाराष्ट्रातून गेलेल्या प्रत्येक मराठी व्यक्तीने अजितची आवर्जून भेट घ्यावी... हिडींबा मातेने घटोत्कचासारखा योद्धा जन्माला घातला... परिस्थितीशी दोन हात करत, उद्योग धंदा यशस्वी करण्याचं धाडस आपला अजित शिंदे नावाचा मर्द मावळा दाखवतोय. त्याला भेटा आणि आत्मविश्वास काय असतो ते अनुभवा... तो तुमची वाट पाहतोय.