close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत?

( बजबजपुरी असलेल्या ) सांस्कृतिक नगरी ( ??) , मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे आज येत आहेत. मात्र मनापासून स्वागत का करावं, असा प्रश्न पडला आहे.

Updated: Oct 26, 2017, 09:20 AM IST
राज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत?

अमित जोशी / कल्याण -

( बजबजपुरी असलेल्या ) सांस्कृतिक नगरी ( ??) , मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे येत आहेत. मात्र मनापासून स्वागत का करावं, असा प्रश्न पडला आहे.

मुंबईत झालेली उलथापालथ लक्षात घेता राज ठाकरे नेमके कशाकरता कडोंमपामध्ये येत आहेत हे आता सर्वांनाच चांगले माहीत आहे. थोडक्यात ते काही कडोंमपामधील नागरी समस्या सोडवण्यासाठी इकडे येत नाहीयेत.

2009 ला विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महापालिका क्षेत्रात पहिले मोठे यश हे मनसेला कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मिळाले होते. मोठा विश्वास सर्वसामान्यांनी मनसेवर - राज ठाकरे यांच्यावर टाकला होता. आता धडाकेबाज पद्धतीने कडोंमपामधील समस्या सुटतील असे तेव्हा वाटले होते. मी नियमित इथे येत जाईन असेही त्यांनी म्हणाल्याचं चांगलं आठवते. मात्र तसे काही झाले नाही. मनसेची आंदोलने झाली मात्र प्रभाव पडला नाही म्हणा किंवा आधी असलेला दरारा कमी पडला म्हणा, परिस्थिती सुधारली नाही हे मात्र खरे. राज ठाकरे यांनी थोडं म्हणजे अगदी जरा लक्ष दिले असते तरी प्रश्न सहज सुटले असते अशी तेव्हा लोकांना आशा होती, तशी अपेक्षा होती. तसं मात्र काही झाले नाही.

कडोंमपा मध्ये 2010 साली समस्या होत्या. 2015 नंतर आजही कायम आहेत.

काही हजार कोटींचा ( 6500 कोटी ???? ) लोण्याचा गोळा खाण्यासाठी सेना-भाजप एकत्र सत्तेत आहेत अशी टीका सत्तेतील पहिल्या दिवसापासून होत आहे. मात्र इथे गोळाही दिसत नाहीये. ' विकास ' पगला गया है असं म्हणतात, मात्र इथे तर आत्तापर्यंत तो कधीच दिसला नाही.

अजूनही रस्त्याने धड चालता येत नाही. कडोंमपात स्टेशनबाहेर भयानक परिस्थिती अजूनही आहे , तिथे तर रिक्षा - फेरीवाले यांचेच राज्य आहे. खड्डे आणि गतिरोधक या विषयांबाबत पीएचडी होऊ शकेल अशी स्थिती आहे. परिवहन सेवा म्हणजे काय रे भाऊ अशी स्थिती आहे. सर्वजण या साध्या - साध्या समस्या सांगून थकले आहेत.

कडोंमपामध्ये कल्याण डोंबिबली व्यतिरिक्त मोठा भाग आहे ( 27 गावे, टिटवाळा परिसर ) हे अजून कोणाला बहुतेक माहीतच नसावे इतकी तिथे भयानक नागरी समस्यांची अवस्था आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधूनमधून येत असतात, उद्धव ठाकरेही कधीतरी येतात, मात्र त्यानमुळे काहीही फरक पडलेला नाही. काँग्रेस - राष्ट्रवादी यांनी तर या शहरांना कधीच गांभीर्याने घेतले नाही.

इथे पालिका आयुक्त म्हणून येणारे अधिकारी अनेकदा तर साईड पोस्टिंग म्हणूनच येतात. ' खमका ' असा आयुक्त दुर्देवाने या पालिकेला लाभलाच नाही. प्रशासनला ताळ्यावर आणण्याची धमक तर अजून कोणीच दाखवलेली नाही. त्यामुळे कडोंमपामधील समस्यांमध्ये काहीही बदल झालेला नाही.

अशी परिस्थिती असतांना राज ठाकरे यांच्या कडोंमपा दौऱ्याबद्दल अजिबात उत्सुकता नाहीये. ते गेल्यानंतरही आमची पालिका तशीच रहाणार आहे हे वास्तव आहे.