भगदाड ! बोलणार नाही. मी मौनात आहे, सामान्य मुंबईकर

मुंबईत पूल दुर्घटनेच्या घटना वारंवार घडूनही रेल्वे आणि मुंबई पालिका प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. एल्फिस्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीच्या कटू आठवणीने अजूनही मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो.  

Updated: Mar 16, 2019, 10:37 PM IST
भगदाड ! बोलणार नाही. मी मौनात आहे, सामान्य मुंबईकर title=

मुंबईत पूल दुर्घटनेच्या घटना वारंवार घडूनही रेल्वे आणि मनपा प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. एल्फिस्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीच्या कटू आठवणीने अजूनही मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो. देशाच्या आर्थिक राजधानीत इतकी बेपर्वाई  कशी असू शकते? अजून किती सामान्य मुंबईकरांचे बळी हवे आहेत? असा सवाल विचारला जातोय. या सर्व परिस्थितीला आपली व्यवस्था पण तितकीच जबाबदार आहे. दररोज 65 ते 70 लाख लोक मुंबईत लोकलने ये-जा करतात. मात्र एवढी मोठी संख्या असून रेल्वेचं आणि स्थानिक प्रशासनाचं वाहतूक व्यवस्था आणि इतर सुविधांकडे दुर्लक्ष होतंय. या मायनगरीत वारंवार मृत्यूचं तांडव होऊनही कोणीही अधिकारी, नेते मंडळी झोपेतून जागे होईनात. दुर्घटनेनंतर आश्वासनांची तात्पुरती मलमपट्टी होते. आरोप-प्रत्यारोप यांचा खेळ सुरू होतो. काही काळाने पुन्हा जैसे थे...मुंबई आपली धावतेय न थकता...मुंबईकरांच्या हिंमतीच कौतुक होतं. पण तोही आता खचलाय. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांनी तो पुरता निराश झालाय. परिस्थीती सुधारायला कोणीही पुढे येत नाही. नेत्यांची केवळ पोकळ आश्वासने मिळतात. मुंबईच शांघाय, सिंगापूर केवळ कागदावरच. कोट्यवधींचा निधी कुठे मुरतो हाच खरा प्रश्न आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळीकडे उदासीनता हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर व्यथित झालेल्या एका मुंबईकराचं रुदन...

एल्फिस्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीच्या कटू आठवणीने  मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो. देशाच्या आर्थिक राजधानीत इतकी बेपर्वाई  कशी असू शकते? अजून किती सामान्य मुंबईकरांचे बळी हवे आहेत? असा सवाल विचारला जातोय. त्याचवेळी अभिनेत्री रेणूका शहाणे यांनीदेखील पूल दुर्घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. आपल्या आर्थिक राजधानीची परिस्थिती दयनीय असून आपण नेहमी नागरिकांचे प्राण गेल्यानंतरच जागे का होतो, असा संतप्त सवाल केला आहे. सर्वात श्रीमंत महानगरपालिका असूनही लोकांच्या जीवाची शून्य किंमत असल्याची भावना व्यक्त होत आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली जाते. तरीही त्या पैशातून गेलेले जीव पुन्हा येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. 

भगदाड

मी कुठे म्हणतोय ही यंत्रणेची पोलखोल आहे.
मी कुठे दाखवतोय हे व्यवस्थेला पडलेलं भगदाड आहे.
मी कुठे ऐकवतोय तुम्हाला चेंगराचेंगरीत दबून मेलेला आवाज...
मी मौनात आहे. डोळयासमोर घटना नाचतायेत. 
त्याच काहीबाही बोलतायेत. 
मी निःशब्द आहे. 
सांगितलं ना तुम्हाला...
मी मौनात आहे. 

कधी दोन, कधी चार तर कधी थेट 20 च्या पुढे 
आकडा जातो.
अंतिम लिस्ट येते सरकारी हॉस्पिटलमधून...
त्याने दुसऱ्या दिवशी छान मथळे सजतात. 
चौकटीत शहराचे चौकीदार, रक्षक, भक्षकांचे 
आसवात भिजलेले बोल असतात. 

अहो दादा, ही मंडळी तरी काय करणार ? 
देवा जाऊदे माफ कर त्यांना...
मुंबईच ओसंडून वाहतेय. 
ओव्हरफ्लो झाल्यावर थोडं 
इकडे-तिकडे होणारच 

देवा नाहीच जमलं तुला माफ करणं
त्यांचा घडा भरलाच असेल तर,
सामान्यांना थोडं मागे ठेऊन 
यंत्रणेतील भ्रष्ट किड्यांना 
होऊ दे मरणाच्या वेदना

आम्हालाही थोडा दीर्घ श्वास घेऊ दे...
मरण्यापुर्वी जगून घेऊ दे...
एवढं जमलं तर नक्की कर देवा...
बघूया दुसऱ्या दिवशी याची बातमी 
किती मोठ्या कॅनव्हासवर येते. 
आली तरी मी काही त्यावर 
बोलणार नाही.
मी मौनात आहे. 
सामान्य मुंबईकर आहे.

- श्री. गिरीश निकम
मुंबई , 15/03/2019