close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राहुल गांधी यांच्यासमोरील प्रमुख 10 आव्हाने !

   राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांच्यासमोर आव्हानांचं डोंगर आहे. नेमकी  कोणती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. त्यावर आढावा घेऊ या….

Updated: Dec 16, 2017, 07:07 PM IST
 राहुल गांधी यांच्यासमोरील प्रमुख 10 आव्हाने !

धनंजय शेळके, झी मीडिया, मुंबई :   राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांच्यासमोर आव्हानांचं डोंगर आहे. नेमकी  कोणती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. त्यावर आढावा घेऊ या….

पहिले आव्हान -  जुन्या आणि तरुण नेत्यांममध्ये समन्वय राखणे

सोनिया गांधी यांच्याकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांना पहिलं मोठं आव्हान जे असेल ते म्हणजे जुने नेते आणि नवे नेते यांच्यात योग्य तो समन्वय ठेवण्याचं. जुने नेते आणि काही तरुण नेत्यांना संधी देऊन संघटना अधिक बळकट करण्याचं आव्हान राहुल गांधी यांच्यावर असेल. राहुल गांधींनी त्यांची एक तरुण नेत्यांची फळी तयार केली आहे. त्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, राजीव सातव यांच्यासारखे अनेक तरुण नेते आहेत. तरुणांना संधी देताना जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याचीही काळजी राहुल गांधी यांना घ्यावी लागणार आहे. काही जुन्या नेत्यांबद्दल राहुल गांधी यांच्या मनात किंतु परंतु असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये यापूर्वी व्हायची. मात्र सोनिया गांधींमुळे त्यामध्ये बॅलन्स राखला जायचा. आता राहुल गांधी स्वतःच अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना या नेत्यांबद्दलचा किंतु परंतु काढून टाकावा लागेल.
 

दुसरे आव्हान - पक्षाच्या नेत्यांमधील गटतट संपवणे, त्यांच्यातील मतभेद कमी करण्याचे आव्हान…

काँग्रसमध्ये पूर्वापार गटतटाचं राजकारण चालत आलेलं आहे. पूर्वी हे गटतट अनेकवेळा पक्ष नेतृत्वानेच तयार केल्याचं बोललं जायचं. त्यावेळी काँग्रेस पक्षाला तगडा विरोधक नव्हता. त्यामुळे तेव्हा गटातटाच्या राजकारणाचा पक्षाच्या कामगिरीवर फारसा परिणाम होत नसे. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. विरोधक आता काँग्रेसपेक्षा बलवान झाला आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांमधले गटतट कमी केल्याशिवाय पक्षाला यश येणं अवघड आहे. महाराष्ट्राचाच विचार केला तर विदर्भातील एक मोठा गट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हण यांच्यावर नाराज आहे. प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात काँग्रेसमधील गटांमध्ये लाथाळ्या आहेत. त्या संपवल्याशिवाय किंवा कमी केल्याशिवाय पक्षाला यशाची कमान गाठता येणार नाही.

तिसरे आव्हान -  काँग्रेसचा परंपरागत मतदार पुन्हा पक्षाकडे खेचणे आणि नवा मतदार तयार करणे

 दलित, मुस्लिम, आदिवासी आणि ओबीसी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसपासून दूर गेला आहे. दलित मतदार वेगवेगळ्या पक्षाकडे विखरुला गेला आहे. तर काही दलित मतदार हा भाजपकडेही सरकला आहे. पूर्वी मुस्लिम मते काँग्रेसला एकगठ्ठा व्हायची. आता मात्र एमआयएम किंवा इतर पक्षात मस्लिम मतदार विखुरला गेला आहे. त्याचसोबत ओबीसी मतदार तर पक्षाकडून कधी भाजपने हिरावून घेतला आहे. हे सर्व मतदार पुन्हा काँग्रेसकडे पुन्हा आकर्षित करण्याचं मोठं आव्हान राहुल गांधी यांच्यापुढे आहे. पारंपरिक मतांवर विरोधकांनी डल्ला मारल्यामुळे इतर मतदारही पक्षाकडे खेचावे लागतील.

चौथे आव्हान - तरुण आणि मध्यमवर्गाला काँग्रेसकडे आकर्षित करण्याचं आव्हान 

नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून तरुण मतदार मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळाला आहे. मोदींची वकृत्त्व शैली असो किंवा त्यांच्यातली आधुनिकता, विकासाचं राजकारण यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात मोदींककडे आकर्षित झाला आहे. याउलट काँग्रेसमध्ये परंगरागत पद्धतीला कवटाळल्यामुळे आधुनिकता पक्षात दिसत नाही. त्यामुळे तरुण मतदार काँग्रेसपासून दूर गेला आहे. तो काँग्रेसकडे कसा आकर्षित होईल याच्यासाठी प्रयत्न करण्याचं आव्हान राहुल गांधीसमोर आहे. काँग्रेसकडून दलित, मुस्लिम, ओबीसी हे पारंपरिक मतदार तर दूर गेले आहेतच. त्याचबरोबर मध्यमवर्ग मतदार काँग्रेसपासून मोठ्या प्रमाणात दूर गेला आहे. तो पक्षाकडे खेचण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण करण्याचं आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर आहे.

पाचवे आव्हान -  नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आपण जिंकू शकतो हा विश्वास निर्माण करणे …

सोनिया गांधींच्या प्रकृती कारणामुळे गेल्या काही वर्षात राहुल गांधीच पक्षाची धुरा वाहत होते. गेली लोकसभा निवडणूक असो किंवा काही राज्यातल्या विधानसभा निवडणुका असो. अनेक ठिकाणी पक्षाला दारुण पराभवला सामोरं जावं लागलं  आहे. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात आत्मविश्वासाची कमी आहे. तो आत्मविश्वास निर्माण करण्याचं आव्हान राहुल गांधीपुढे आहे.

सहावे आव्हान - भ्रष्ट पक्ष ही पक्षाची प्रतिमा पुसून टाकणे 

2014 ची लोकसभा निवडणूक आणि त्या आधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. टू जी प्रकरण असो किंवा, कॉमनवेल्थ गेममधील घोटाळा असो. त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. भ्रष्ट नेत्यांचा पक्ष अशी पक्षाची प्रतिमा झाली आहे. ती सुधारणे आणि भ्रष्टाचाराचे डाग पुसून काढण्याचं आव्हान राहुल गांधींसमोर आहे. त्यासाठी घोटाळांचे आणि डागाळलेले नेते पक्षापासून दूर ठेवावे लागतील.

 
सातवे आव्हान -
यूपीएची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणे आणि अधिक घटक पक्ष जोडणे

यूपीए 1 आणि यूपीए 2 यांच्या यशस्वी मोट बांधण्याचं काम सोनिया गांधी आणि मनमोहसिंग यांनी केलं होतं. आता त्याच प्रकारे यूपीएची घडी नव्याने बांधण्याचं आणि  नवे घटकपक्ष सोबत घेण्याचं आव्हान राहुल गांधीसमोर आहे. मित्रपक्षातील ज्येष्ठ नेत्यांबाबत राहुल यांच्या मनात किंतु परंतु असल्याची चर्चा आहे. त्याला विराम देऊन त्यांना सोबत घ्यावं लागणार यांच्यासोबतच तृणमुल काँग्रेस किंवा इतर पक्ष असतील अधिक अधिक घटक पक्षांना यूपीएमध्ये घेण्याचं आणि त्यांच्यात योग्य तो समन्वय आणि विश्वास निर्माण करणयाचं आव्हान राहुल गांधीसमोर आहे.

आठवे आव्हान - काही मोठ्या राज्यांमध्ये पक्षाला नवसंजीवनी देण्याचं आव्हान 

उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश यासारख्या मोठ्या राज्यात सध्या काँग्रेसची संघटना खिळखिळी झाली आहे. तिथे पक्षाला नवसंजीवनी देणे गरजेचे आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी गुजरातनंतर कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये निवडणूक आहे. तिथे पक्षाची स्थिती सुधारण्याचे आव्हान राहुल यांच्यापुढे आहे.

नऊ आव्हान -  हिंदू विरोधी आणि हायकमांडवर चालणारा पक्ष ही प्रतिमा दूर करावी लागेल

2014 च्या निवडणुकीतील पराभवाची कारणमिंमांसा करण्यासाठी माजी संरक्षणमंत्री ए के अन्टोनी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अभ्यास करुन काही निष्कर्ष काढले होते. ते सार्वजनिक करण्यात आले नव्हते. मात्र त्यामध्ये काँग्रेस हा मुस्लिमांचं लांगूलचालन करणारा पक्ष आणि हिंदूविरोधी पक्ष अशी प्रतिमा तयार झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ती प्रतिमा दूर करण्याचं आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर आहे. त्यामुळेच राहुल गांधी सध्या गुजरातच्या प्रचार दौ-यात ते मंदिरांना भेट देत आहेत. राहुल गांधी यांनी पक्षात लोकशाही रुजवण्याचा प्रय़त्न केला होता. मात्र त्याला म्हणावे तसे यश आले नाही. यापूर्वी काँग्रेसने नेहमी मासबेस नेत्यांना मोठे होऊ न देण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यामध्ये सुधारणा करावी लागणार आहे. प्रत्येक राज्यात तरुण आणि मासबेस नेत्यांना ताकद द्यावी लागणार आहे. सध्या राजस्थानमध्ये ज्या प्रकारे सचिन पायलट यांच्याकडे नेतृत्व देण्यात आलं आहे. तिथे त्यांनी जोरदार काम सुरू केले आहे. त्याचा फायदाही येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या काळी ज्या प्रमाणे निवडून आल्यानंतर हायकमांड ठरवेल तो नेता अशा परिस्थिती राहिल्यास पक्षाला पुढे जाण्यास मर्यादा येणार आहेत.

दहावे आव्हान - राहुल गांधीना फूलटाईम राजकारणी अशी प्रतिमा तयार करावी लागणार

नाताळ असो किंवा इतर कुठली सुट्टी राहुल गांधी परदेशी दौ-यावर सुट्टीला निघाले. त्यानंतर संघटनेपासून ते अनेक दिवस गायब असतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा ही पार्टटाईम राजकारण अशी काही प्रमाणात का होईना झाली आहे. त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. 24 तास राजकारणी अशी प्रतिमा तयार करावी लागेल. अन्यथा त्यांना भारतीय मानसिकतेचे मतदार फारसे गांभीर्याने घेणार नाहीत.