close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पिंपरी चिंचवड : पूर, मदत आणि मदतीचं नियोजन

पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात पिंपरी-चिंचवडनेही कसलीच कसर सोडली नाही

कैलास पुरी | Updated: Aug 20, 2019, 01:27 PM IST
पिंपरी चिंचवड : पूर, मदत आणि मदतीचं नियोजन

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : कोल्हापूर सांगली आणि सातारा या शहरांना पुराचा तडाखा बसला आणि संपूर्ण महाराष्ट्र हवालदिल झाला. 'झी २४ तास'चे कोल्हापूरचे कॅमेरामन मिथुन राजाध्यक्ष यांनी जवानांना पाया पडणाऱ्या सुजाता आंबी या महिलेच्या टिपलेल्या दृश्यांनी या पुराची व्याप्ती आणि दाहकता किती आहे, याची जाणीव राज्यालाच नाही तर देशाला करून दिली. अर्थात संकटाच्या काळात मदत करण्यासाठी कायम तत्पर असलेल्या महाराष्ट्रातील जनतेने मदतीचा हात पुढे केला. संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरु झाला. अर्थात ही मदत करत असताना ही काही महाभागांना जाहिरातबाजी करण्याचा मोह आवरला नाही हेही तितकेच खरे!

पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात पिंपरी-चिंचवडनेही कसलीच कसर सोडली नाही. अनेक सामाजिक संघटना, संस्था, कर्मचारी, राजकीय पुढारी या सर्वांनीच आपापल्यापरीने पूरग्रस्तांना मदत केली. पण या सर्वात आघाडी घेतली ती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी... त्यांचे राजकारण, पार्श्ववभूमी याचा अभ्यास निवडणुका जवळ आल्याने जो तो करत राहील पण पूरग्रस्तांना मदतीमध्ये मात्र त्यांच्या टीमने केलेले काम उत्कृष्ट होते यात शंका नाही.

जवळपास १५० कार्यकर्त्यांच्या टीमने नागरिकांनी केलेली मदत गोळा करण्याचे काम केले. मदतीच्या आवाहनाला पिंपरी-चिंचवड खासकरून भोसरीमधल्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद एवढा होता की तब्बल ३५ ट्रक साहित्य जमा झाले. त्यात कपडे, औषधापासून जनावरांच्या चाऱ्याचाही समावेश होता. 

असंख्य कार्यकर्त्यांनी या साहित्याचे दिवसरात्र थांबून पॅकिंग केले. एका कुटुंबाला लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच वेळी देता यावे, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली. अर्थात ही मदत योग्य ठिकाणी पोहचावी यासाठी मूळच्या कोल्हापूर, सांगलीचे असलेल्या पण सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या तरुणांची मदत घेण्यात आली. या तरुणांनी मदतीसाठी गावांची निवड, मदत कोणाच्या हाती द्यायची याची आखणी केली. आणि त्यानुसार ही मदत महेश लांडगे यांनी त्यांच्या टीमसह त्या त्या भागात पोहचवली. भोसरी मधल्या १२ डॉक्टरांचे पथक, दोन रुग्णवाहिका आणि जवळपास ३००० कुटुंबासाठीची औषधे याची ही नियोजनबद्ध आखणी करण्यात आली. 

राज्यातल्या अनेक भागातून पूरग्रस्तांकडे मदत जात आहे. पण योग्य नियोजन नसले तर ती मदत योग्य हातात जाईलच, याची खात्री देता येत नाही. म्हणूनच महेश लांडगे आणि त्यांच्या टीमने केलेल्या नियोजनाचे कौतुक आवश्यक आहे. अर्थात महेश लांडगे यांना विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, हे उघड असल्याने त्यांनी मदत केली असा एक सूर आहे आणि तो राहणार हे जरी खरे असले तरी पिंपरी चिंचवडकरांच्या मदतीला योग्य हातात पोहचवण्यासाठी लांडगे आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजनाचे दर्शन पिंपरी-चिंचवडकरांना करून दिले हे मात्र नक्की.