राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी मराठा आरक्षणसाठी राज्यात सुरू असलेल्या आक्रमक आंदोलनासंदर्भात पत्र लिहिलं आहे. हे पत्र मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून लिहीलं आल्याचं दिसून येत आहे. या पत्रात शरद पवारांनी राज्यकर्ते आणि हितसंबंधी या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आणि इतर बहूजन समजांपासून फूट पाडण्याचा डाव खेळत आहे. मराठा समाजाला इतर समाजांपासून एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील शरद पवारांनी केला आहे.
शरद पवार यांनी लिहिलेलं हे पत्रक खाली जसेच्या तसे देत आहोत.
शरद पवार (11 ऑगस्ट 2018) मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही, परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे. त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजेत.
आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्य आणि बहुजनांचा पाठिंबा आणि सदिच्छा प्राप्त झाल्या, त्याला धक्का लागेल असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे.
येथे हे नमूद करणे आवश्यक आहे की, राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहे.
मराठा समाजाला इतर समाजांपासून वेगळे आणि एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये, याची पक्की खूणगाठ आंदोलकांनी ठेवली पाहिजे, त्यांच्या या खेळीला आंदोलकांनी बळी पडू नये.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून हे आंदोलन केले जात आहे. त्या छत्रपतींनी अठरा पगड जातींना, बारा बलुतेदार बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. त्या आदर्शाना धक्का लागेल असे आचरण आपल्या हातून घडणार नाही. याचीही खबरदारी आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे.
हिंसाचाराच्या ताज्या घटनांमुळे सुरूवातीला शांततामय मार्गाने आंदोलन झाल्याबद्दल निर्माण झालेली समाजातील सदिच्छा गमावणे, हे चांगले लक्षण नाही. हे मी विशेषत्वाने नमूद करू इच्छीतो.
गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेने शेतकरी आत्महत्येच्या संदर्भात केलेल्या पाहणीत मराठा समाजाबद्दलची विदारक स्थिती मांडण्यात आली आहे. कुटूंबाच्या विस्तारानुसार जमीनीचे लहान-लहान तुकडे पडत गेल्याने, शेती किफायतशीर राहिली नाही.
यातून आलेल्या आर्थिक हालाखीमुळे पुरेसे शिक्षण नाही आणि नोकऱ्याही नाहीत अशा दृष्ट चक्रात तरूण सापडला आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यास दारुण वस्तुस्थितीची माहिती होईल. मराठा समाजातील भूमीहीनांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे २८ टक्के आहे.
काठावरचे आणि अल्पभूधारक (मार्जिनल 0.01 ते 2.5 एकर) ५३ टक्के. अल्पभूधारक (२.५ ते ५ एकर) ५८ टक्के, (५ ते १० एकर जमीन असणारे) ६३ टक्के आहेत. त्याचप्रमाणे यातील ६० टक्के जमीनीला हमखास पाणीपुरवठा नाही. यातून ही समस्या चिघळत गेलेली आहे.
आत्महत्यांचे प्रमाण ४६ टक्के आहे. हे पूर्वी समोर आलेलेच आहे. वर्षानुवर्षे यामुळे मराठा समाजात आणि विशेषत: युवकांच्या मनात राग साठणे, नैसर्गिक असले तरी, जाळपोळ, दगडफेक करणे, किंवा आत्महत्या करणे हा मार्ग नक्कीच नाही.
एखादे आंदोलन सुरू झाल्यानंतर कुठे थांबायचे याचा विचार करायचा असतो. हा विचार केल्याबद्दल अभिनंदन. या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या तीव्र भावना देशासमोर आल्या आहेत. या मागणीच्या पूर्ततेच्या संदर्भात काही वैधानिक प्रक्रियेची आवश्यकता आहे.
यासाठी उचित वेळ आवश्यक आहे. त्यापुढे आरक्षणाच्या अंमलबाजावणी संदर्भात वेळ, राज्य शासन आणि विधिमंडळ प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी शांतता आवश्यक आहे.
तसेच राज्यातील औद्यागिक क्षेत्रास राज्यातील आंदोलनाची झळ बसणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अशा आंदोलनाने राज्यातील उद्योग धंद्यातील गुंतवणूक थांबेल, आणि बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल. म्हणूनच मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
शरद पवार (11 ऑगस्ट 2018)