close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गर्लफ्रेंडचं लग्न ठरत तेव्हा..

 

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 16, 2017, 04:01 PM IST
गर्लफ्रेंडचं लग्न ठरत तेव्हा..

प्रविण दाभोळकर, झी मीडिया.मुंबई : 

क्रश : माझ्या लग्नाला येशील ना??
तो :  हो. येईन की.
तो :  (मनातल्या मनात)- 'माझ्या' नको म्हणू 'आपल्या' म्हण वेडे

( लग्न सराईच्या दिवसात सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होतोय)

आपली क्रश किंवा एक्स गर्लफ्रेंड आपल्या समोर जेव्हा स्वताच्या लग्नाबद्दल सांगते तेव्हा अचानक झोप उडल्यासारखं वाटत. 
आपण तिच्याशी लग्न केलं असत का ? या प्रश्नापेक्षा ती दुसर्या सोबत लग्न करतेय हा विचार धक्का देणारा असतो.

बर. ते प्री-वेडिंगचे फोटो जखमेवर अजून मीठ चोळतात राव. फक्त फोटोसाठी पोज द्यायची म्हणूनच तिने स्माईल दिली असेल याउपर काही नाही, अशी मनाची भोळी समजूत घालावी लागते. 'आमचे खूप सेल्फी आहेत त्यात कसली दिलखुलास हसतेय ती.' (उगीच आठवणीत)

" कसा आहे तो?कसा दिसतो? कसा वागतो? शोभत नाहीए तुला तो.." न राहवून (रागात) शेवटच्या भेटीत थेट तोंडावरच बोललो..

ती : "खूप प्रेम करतो तो माझ्यावर..आम्ही लग्न करणार आहोत" ( हाथ पकडून तेवढ्याच शांत आणि समजूतीने) 

(आपण निरुत्तर)

आपल्याला हवा तेवढा वेळ मिळाला पण आपण निर्णयापर्यंत नाही पोहोचू शकलो. Life goes on...  कोणी कोणासाठी थांबत नाही हेच खरं. 

लग्न केल्यावर आतासारखी मज्जा मस्ती करता येणार नाही असं त्यावेळी सारख वाटायच. जबाबदारी घ्यायला नको असही याला म्हणू शकतो. तरीपण लग्न झालेल्यांना त्यांचे अनुभव विचारण हे आपल्या आवडीचं काम.

 त्यावेळी त्यांची बॉडी लँग्यूएज शब्दांच्या पलीकडचं सांगून जाते. म्हणजे लग्नाला प्रोत्साहन देतोय असही वाटू देत नाहीत आणि परावृत्त करतोय असही नाही. (यामागचं कारण त्यांनाच माहीत)

काहीजण थांबतात आणि विचार करतात नेमकं काय सांगायचं?, सुरुवात कुठून करायची?
मोठा श्वास घेऊन,"केल्यावर कळेल, करून बघ" हे कॉमन उत्तर.

मागे वळून पाहिलं तर आपण मोठे कधी झालो हेच कळत नाही. 'आता काय पाळण्यात नाहीयेस मोठा झालायस' इथं पासून ते 'आता काय शाळा-कॉलेजात नाहीयेस मोठा झालायस' इथपर्यंतचा प्रवास कधी झाला हेच आठवत नाही. 

'काहीही झालं तरी पुढच्या वर्षी उरकून टाकायला हवं' अस अचानक घरी कोण तरी म्हणत आणि आपण ताडकन उभे राहतो.

हे कसं शक्य आहे? खायच काम आहे का? पुढे कस होणार? आपल्याला कोण सहन करणार आयुष्यभर?आणि आपण तरी कोणाला सहन करू का?  असे चिक्कार चिक्कार विचार. 

 लग्न न केलेली एक मैत्रीण (वय साधारण ३२-३३ वर्ष) सांगत होती, "काही फरक पडत नाही रे. माझं मी कमावते, खाते. लग्न करणे म्हणजे आयुष्य पूर्ण होत अस कुठे लिहिलंय का? माझी काळजी मी स्वतः घेतलीय त्यासाठी दुसर्या कोणाला 'लग्ना'च्या नावाखाली ती घेण्याची गरज नाही."

लव्ह मॅरेज झालेल्या कपलचे अचानक खटके उडू लागले. कारण होतं पिरियड्स चे दिवस ती घरी पाळते म्हणून. शहरात शिक्षण घेऊनदेखील चाली रीती पाळणं त्याला पटत नव्हतं. (लग्न झाल्यानंतर भांडणाला कारणच पाहिजे असं काही नसतं हे त्याला सांगायचं होत)

'जेवढं उशिरा लग्न होईल तेवढं पुढच्या गोष्टींना उशीर होतो.' नुकतंच लग्न ठरलेला एक मेडिकल फिल्ड मधला मित्र सांगत होता. आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात आपल्या शरीराला आधीच जीवनसत्व खूप कमी मिळतात, त्याचा परिणाम शरीरात खोलवर होत असतो. 
त्यात करिअरच्या नादात फॅमिली आणि फॅमिली प्लानिंग वेळेत करता आलं नाही तर आयुष्यभर त्याची फळ भोगावी लागतात अस काही त्याला सांगायच होत.

"आपल्याकडे स्वत:च घर आहे, एकुलता एक आहोत, आपण उभे राहिलो तरी केव्हाही लग्न होईल असं मला तेव्हा वाटायचं, त्यामुळे आता तरुण आहोत तोपर्यंत पैसा कमवून घ्यावा अस ठरवलं आणि सर्वच बिघडलं." एका कंपनीत सिनिअर पोस्टवर काम करणारा अधिकारी सांगत होता. आता पैसा आहे पण आयुष्यात पुढचं प्लानिंग लग्न होत नसल्यामुळे अडकून राहिलंय हे तो  वयाच्या ३७ व्या वर्षी सांगत होता.

लग्नाआधी खूप प्रेम प्रकरणात असलेल्या मित्राला त्याच्या लग्नानंतरचा अनुभव विचारला.  "खूप भारी वाटतंय. बायकोमुळे घरी वेळेवर जायची चांगली सवय लागली. कोणता नवा सिनेमा नेट वर आला की पेन ड्राईव्ह मध्ये नेऊन आम्ही सहपरिवार बघतो, सुट्टीच्या दिवशी फिरायला जातो. सर्व मनासारखं झालाय. सध्यातरी आम्ही दोघेही आपापल्या करियरवर फोकस करतोय." अस आनंदाने सांगत होता.

अजून थोडावेळ थांबू मार्केटमध्ये चांगला मोबाईल येईल ही गोष्ट मोबाईलच्याच बाबतीत लागू होते. याला लग्नाशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यां अनेकांना डोक्यावर हाथ मारण्याची वेळ आली आहे.

लग्न करून पहावं? की पाहून करावं?  लग्नाचं वय कोणतं? हे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार ठरवतो. 

पण यापुढे कधी 'तुमच प्रेम' तुम्हाला 'माझ्या लग्नाला येशील ना??' अस विचारेल तेव्हा 
'माझ्या' नको आपल्या' म्हण वेडे' अस मनातल्या मनातच बोलायची वेळ येऊ नये म्हणजे झालं.

कारण

हातांच्या मुठीतून रेती निसटावी अशी वेळ निघून जाते. सांभाळताही येत नाही. आणि सावरताही येत नाही.