जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : जे यूट्यूबने जाहिरातदारांसाठी केलं, ते जर टेलव्हिजनसाठी जाहिरात देणाऱ्या कंपन्यांनी केलं, तर टेलव्हिजनमध्ये सुमार दर्जाच्या गोष्टी, बातम्या म्हणून प्रसारीत करण्यात येतात, त्या पुन्हा कधीच दिसणार नाहीत, आणि टेलव्हिजन मीडियामध्ये नकळत पणे बातम्या सादर करताना एक आदर्श आचार संहिताच लागू होईल.
गुगलची कंपनी यूट्यूब ही जाहिरात देणाऱ्यांची नेहमी काळजी घेत आलेली आहे. अगदी नेटीझन्सने जाहिरातीवर चुकून क्लिक केलं, तरी पैसे परत दिले जातात. ज्यांच्या व्हिडीओवर जाहिरातींचं प्रसारण होतं, त्यांना याविषयी कल्पना दिली जाते.
गुगल अॅडसेन्सने व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना पैसे मिळतात, तर गुगल अॅडवर्ल्डच्या माध्यमातून तुम्हाला तुमची जाहिरात यूट्यूबवर प्रसारीत करता येते.
यूट्यूबने व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांसाठी जाहिरात देण्याच्या बाबतीत, नियम अधिक कडक केले असताना देखील, काही महिन्यापूर्वी काही ऑनलाईन जाहिरातदार कंपन्यांनी यूट्यूबला जाहिरात न देण्याचा निर्णय घेतला.
ज्या नावाजलेल्या यूट्यूबर्सची महिन्याच्या काठी लाखो रूपयांची कमाई होत होती, त्यांना हजारो रूपयेच महसूल महिन्याच्या काठी हाती लागला. यूट्यूबर्समध्ये चिंतेचं वातावरण होतं.
जाहिरातदार कंपन्या यूट्यूबवर नाही, तर यूट्यूबवर जो कंटेन्ट अपलोड केला जातो त्यावर नाराज होते, असा कंटेन्ट जो खोटारडा होता आणि दिशाभूल करणारा आहे, अशा कंटेन्टवर जाहिरात कंपनीचे लाखो रूपये खर्च होत होते. दुसरीकडे मात्र मेहनत घेऊन चांगली माहिती देणाऱ्या व्हिडीओंकडे प्रेक्षक पाठ फिरवत होते.
जगबुडी होईल, दहा तोंडा नाग येथे आढळला, पाहा कसा दिसतो तो, व्हिडीओला प्रथमदर्शनी थम्बनेल ही आकर्षक फोटोने, आणि व्हिडीओत काहीच नाही, भ्रमनिरास करणारे व्हिडीओ हे भारतात पहिल्या 100 मध्ये ट्रेन्ड करत होते, दिवसाला लाखो हिट्स या व्हिडीओला जात होते.
दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओंमागे पळणार प्रेक्षकवर्ग तसा जास्त आहे. मात्र जाहिरातदार कंपन्यांना अशा व्हिडीओंना पैसे द्यायचे नाहीत, त्यांच्या जाहिराती पाहणारा वर्ग हा सजग आणि जागृत, थोडक्यात स्मार्ट असला पाहिजे, असं जाहिरात कंपन्याना वाटत होतं, म्हणून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत, काही दिवस यूट्यूबकडे पाठ फिरवली.
यूट्यूबने यावर तात्काळ आपल्या जाहिरात धोरणात बदल केला. ज्या व्हिडीओत काहीच नाही, दिशाभूल करणारा आहे, जसे की, पाहा सापाला दहा तोंडं, उद्या जगबुडी होणार, शुक्रवारी ही वस्तू वापरू नका, पौर्णिमेच्या रात्री ही वस्तू घरात ठेवली, तर तुमच्या घरात पडेल पैशांचा पाऊस, अशा प्रकारच्या व्हिडीओंना यूट्यबने ब्लॅक कॅटेगरीत टाकलं.
ब्लॅक म्हणजे ज्या व्हिडीओचा कन्टेन्ट हा अॅडव्हटायझिंग फ्रेन्डली नाही, किंवा त्याच्यावर कॉपीराईट क्लेम आहेत, म्हणजेच उचलेगिरी केल्याचा संशय आहे, अशा व्हिडीओंना कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नाहीत. म्हणून अशा व्हिडीओला ब्लॅक डॉलरचं चिन्हं लावण्यात येतं, जे फक्त क्रिएटर्सना दिसतं.
दुसरी कॅटेगरी बनवण्यात आली, यलो. यलो कॅटेगरीत तुमच्या व्हिडीओचा कंटेन्ट अॅडव्हटायझिंग फ्रेन्डली आहे का तो तपासण्यात येईल, त्यानंतर तुमच्या व्हिडीओला जाहिराती येतील.
तिसरी कॅटेगरी ग्रीन. ग्रीन म्हणजे, तुमचा व्हिडीओचा कंटेन्ट अॅडव्हटायझिंग फ्रेन्डली आहे. अशा व्हिडीओंना चांगल्या किंमतीच्या जाहिराती यूट्यूबकडून दिल्या जात होत्या.
हे धोरण जाहिरात कंपन्यांनाही पटलं आणि त्यानंतर मेहनत करणाऱ्या यूट्यूबर्सच्या मेहनतीलाही भरपूर फळं आली. हेच जाहिरात धोरण टेलव्हिजन कंपन्यांच्या बाबतीत येण्याची शक्यता आहे, असं झालं, तर 'उद्या जगबुडी होईल', अशा प्रकारच्या बातम्या प्रसारीत करणाऱ्या निर्मात्यांनाही प्रेक्षकांसाठी काय चांगलं असेल, याचा विचार करून बातम्या द्याव्या लागतील.