दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

दहावी (10th) आणि बारावीच्या (12th) विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी.  

Updated: Mar 18, 2021, 10:06 PM IST
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता title=
संग्रहित छाया

मुंबई : दहावी (10th) आणि बारावीच्या (12th) विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी. आता यापुढे दहावी-बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करण्याचा विचार सुरु आहे. राज्य परीक्षा नियोजन समितीकडून (Maharashtra State Examination Planning Committee) गांभीर्याने याबाबत विचार होत आहे. कोरोनामुळे कमी कालावधीसाठी शाळेचे वर्ग भरले त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य परीक्षा नियोजन समिती दहावी-बारावीच्या उत्तीर्णतेचा निकष 35 टक्क्यांऐवजी 25 टक्के करण्याच्या शिफारशीवर गांभीर्याने विचार करत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करावा, अशी मागणी विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केली होती. पण याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सकारात्मक नसल्याचं दिसत आहे.

अपडेट बातमी : SSC-HSC Exam : ती केवळ अफवा, उत्तीर्ण होण्यासाठी इतके टक्के आवश्यक - बोर्ड

कोरोना प्रादुर्भावामुळे 2020-21 या वर्षात कमी कालावधीसाठी शाळेचे वर्ग भरले. वर्गातून शिक्षण न झाल्याने अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे. 30 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेणे शक्यच नसल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत.

खासगी शाळांमधील शुल्काबाबत सूचना 

दरम्यान, खासगी शाळांमधील शुल्काबाबत (Suggestions are invited for regulation of fees) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना शालेय शिक्षण विभागाने गठीत केलेली समिती ग्राह्य धरणार आहे. दरम्यान, पुढील एक महिना www.research.net/r/feeregulation या संकेतस्थळावर सूचना नोंदवता येतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.