मुंबई : राज्यात मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलण्यात आले. त्यानंतर पुणे विद्यापीठाचे नाव बदलण्यात आले. सोलापूर विद्यापीठाचे नामांतर वाद न्यायालयात गेलाय. आता मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ नामांतराचा वाद आणि चर्चा आता मुंबईत पोहोचलेय. शिवसेनेने मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी केलेय. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. त्यामुळे आता नवी चर्चा यानिमित्ताने होण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठाचे नाव राजमाता जिजाऊ भोसले, मुंबई विद्यापीठ करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी केलेय. दत्ता नरवणकर यांनी त्याबाबतचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत सादर केला. त्यामुळे या प्रस्ताव मान्य झाल्यास मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्यात येईल. दरम्यान, या प्रस्तावाला विरोधक सहकार्य करतात का, याची उत्सुकता आहे.
तर दुसरीकडे या प्रस्तावाला सर्वपक्षीय सहमती मिळेल, असा विश्वास दत्ता नरवणकर यांनी व्यक्त केलाय. सध्या सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चर्चेत आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र हा वाद न्यायालयात गेल्यानंतर नामांतर लांबणीवर पडले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या नामांतर होईल की नाही, याची चर्चा सुरु झालेय.