Aamir Khan Kiran Rao Divorce : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. तो सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिर खानने १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता किरण रावने एका मुलाखतीत आमिर खानसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केले.
किरण रावने नुकतंच नवभारत टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिचे आगामी प्रोजेक्टसह खासगी आयुष्याबद्दलही भाष्य केले. यावेळी ती म्हणाली, "मला आमिरसारखा जोडीदार मिळाला, याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. त्याने मला फक्त समजून घेतले नाही तर मला नेहमीच प्रोत्साहन दिले. आमिर हा अतिशय सभ्य आणि हुशार माणूस आहे. मला त्याच्याकडून एक चित्रपट निर्मात्यासोबतच माणूस म्हणूनही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्यावर त्याचा खूप मोठा प्रभाव आहे."
त्यापुढे किरण राव म्हणाली, "आमचे लग्न झालेले असतानाही एकमेकांचे मित्र म्हणून राहणं हे आमच्यासाठी फारच स्वाभाविक होते. कारण आमची मैत्री फार जुनी आहे. आम्ही एकत्र कामही केले आहे. आमचा घटस्फोट हा खूप भांडण, नात्यामध्ये आलेला दुरावा यामुळे झालेला नाही. आमच्या घटस्फोटाचे कोणतेही मोठे कारण नव्हते. लग्नाला काही वर्षे झाल्यानंतर तुमचे नातेसंबंध बदलतात. आम्हाला फक्त आमच्या नात्याची व्याख्या बदलायची होती, पण आमच्यातील नातं गमवायचे नव्हते. कारण आम्ही दोघेही एकमेकांना खूप पूरक आहोत, असे मला वाटतं."
"आम्ही दोघेही आई-वडील म्हणून आमचा मुलगा आझादची जबाबदारी घेतो. आम्ही एकत्र काम करताना खूप मजा केली आहे. आम्हा दोघांसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी हे स्वाभाविक होते. आम्ही घटस्फोटानंतर एकत्र बसतो, एकत्र फिरतो हे बघून लोकांना फार विचित्र वाटते. आमच्यासारखं वागणाऱ्या लोकांची उदाहरणे फार कमी आहे, त्यामुळेच लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. जेव्हा आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्हाला आझादला खूप संवेदनशील पद्धतीने हाताळावे लागले. कारण त्याच्यावर याचा कोणताही मानसिक आघात होऊ नये किंवा त्याच्यावर याचा नकारात्म प्रभाव पडू नये, असे आम्हाला वाटत होते."
"आम्ही खूप सावधगतीने आणि विचारपूर्वक पद्धतीने सर्व पावले उचलली. आम्हाला दोघांनाही हे नातं तोडायचं नव्हतं, हे आम्ही मनाशी पक्कं केले होते. आम्ही कायमच एक कुटुंब म्हणून राहू. पण लोकांना या गोष्टी समजत नाही. त्यांच्यासाठी घटस्फोट म्हणजे सर्व गोष्टींचा अंत. तुमच्या नात्यात एक अशी भिंत तयार होते जी तुम्हाला कधीच तोडता येत नाही. आम्ही तो दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लग्नानंतरही एकमेकांचे मित्र म्हणून राहू शकता. विशेषत: तुम्ही जेव्हा इतकी वर्षे एकत्र घालवता, तेव्हा तुम्ही तुमच्या नात्याचा आदर करता. ते नाते कधीही तुटू देत नाही", असे किरण रावने म्हटले.
दरम्यान किरण राव ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा लापता लेडीज हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट येत्या 1 मार्चला प्रदर्शित होणार आहे.