मुंबई : Deepika Padukone दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणाऱ्या Chhapaak या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच या चित्रपटाविषयी अनेक चर्चा जोर धरु लागल्या आहेत. चित्रपटाची प्रसिद्धी म्हणू नका किंवा मग एखाद्या दृश्यासाठी कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती. प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून जात आहे.
अशा या चर्चांच्या वर्तुळात काहीशा नकारात्मक आणि भुवया उंचावणाऱ्या मुद्द्यांनीही डोकं वर काढलं आहे. ज्यापैकी एक म्हणजे लक्ष्मी अग्रवाल, या ऍसिड हल्ला पिडितेची चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर असणारी नाराजी.
लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनातील काही प्रसंगांचा आधार घेतल Chhapaakमधील 'मालती' साकारत दीपिकाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा या चित्रपटासाठी लक्ष्मी अग्रवालला फक्त १३ लाख रुपये इतकीच किंमत दिली गेल्यामुळे ती नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. ज्याविषयी आता खुद्द लक्ष्मीनेच सर्व चर्चांवर तिची प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे.
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत तिने यासंपबंधीच्याच एका बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. यामध्ये तिने या बातमीवर मोठी फुली मारली होती. ज्याच्या कॅप्शनमध्ये हे सारंकाही खोटं असल्याचं तिने सांगितलं होतं. लक्ष्मीने केलेला हा खुलासा पाहता आता याविषयीच्या चर्चांना किमान पूर्णविराम मिळेल, असं म्हणायला हरकत नाही.
Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच
दरम्यान, मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटातून अतिशय संवेदनशील मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ज्यामध्ये ऍसिड हल्ल्यातील पीडितेचा संघर्ष, तिच्या जीवनात येणारा एक सकारात्मक आणि आयुष्याला कलाटणी देणारा दृष्टीकोन अशा गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. विक्रांत मेसी आणि दिपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.