मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी शून्यातून स्वत:ची आज ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार असलेल्या अनेक कलाकारांनी सुरुवातीला फक्त आपलं पोट भरण्यासाठी लागतील ती काम केली आहेत. यात बऱ्याच दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
आज त्यांच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या यादीत बॉलिवडचा डिस्को डान्सर अशी ओळख असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचा ही समावेश आहे
त्यांनी केलेले बरेच सिनेमे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास 350 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. उत्तम अभिनयासोबत त्यांच्या डान्सवर देखील चाहते फिदा आहेत.
पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास फार कठीण होता. नुकतंच त्यांनी एका शोमध्ये भूक भागावण्यासाठी अनेक पार्ट्यांमध्ये डान्स केला असल्याचा किस्सा सांगितला आहे.
छोट्या पडद्यावरील 'हुनरबाझ देश की शान' या शोमध्ये मिथुनदा स्पर्धकांचे परिक्षण करत आहेत. दरम्यान शोमधील स्पर्धक आकाश सिंह याचा संघर्ष ऐकून मिथुन दा देखील भावूक झाले.त्यावेळी त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संघर्ष करावा लागल्याचं सांगितलं. जेवण मिळेल म्हणून मिथुन दा हे पार्ट्यांमध्ये डान्स करायचे.
सुरुवातीच्या काळात अभिनेत्याकडे पुरेसे पैसे नव्हते. 'मला असे वाटले होते की हिरो म्हणून मला कुणीही चित्रपटामध्ये घेणार नाही. त्यामुळे मी खलनायकाच्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. मी नोकरी देखील करत होतो. जेणेकरुन माझ्याकडे थोडेफार पैसे जमा होतील. जेवायला मिळेल म्हणून मी अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये डान्स करायचो' असं मिथून दा म्हणाले.