माझी प्रेमप्रकरणं होती, Abortion ही झालेलं; घटस्फोटानंतर समंथानं सोडलं मौन

कोणालाही मी माझं आत्मबळ तोडू देणार नाही

Updated: Oct 12, 2021, 11:15 AM IST
माझी प्रेमप्रकरणं होती, Abortion ही झालेलं; घटस्फोटानंतर समंथानं सोडलं मौन  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : घटस्फोट, हा शब्दच जीवनाची घडी विस्कटून टाकतो. मुळात अनेकदा घटस्फोटानंतर काही व्यक्तींच्या जीवनात घातक नात्यांपासून मोकळीक मिळते. पण, अद्यापही घटस्फोटाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र बदललेला नाही. महिलांसाठी भारतात घटस्फोटानंतरचं आयुष्य तसं कठीण, किंबहुना समाजाच्या नानाविध प्रतिक्रियांना सामोरं जाण्यावाचून त्यांच्याकडे गत्यंतर नसतं. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही नुकतीच जीवनाच्या या टप्प्यावरून जात आहे. (Samantha Akkineni naga Chaitanya)

नागा चैतन्य या दाक्षिणात्य अभिनेत्याशी समंथानं लग्नगाठ बांधली होती. जवळपास 4 वर्षांच्या नात्यानंतर समंथा आणि चै या नात्यातून वेगळे झाले. त्यांच्या नात्याला नेमका तडा का गेला हे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पण, याबाबत चर्चा मात्र कैक झाल्या. अनेक तर्क लावले गेले. एकिकडे समंथानं 200 कोटी रुपयांची पोटगी नाकारलेली असतानाच दुसरीकडे मात्र तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं.

अखेर या साऱ्यावर खुद्द समंथानंच मौन सोडलं आहे. एका नोटच्या माध्यमातून समंथानं या साऱ्यावर तिची बाजू मांडल्याचं कळत आहे. ‘माझ्या खासगी आयुष्यातील या वादळामध्ये तुमच्या भावनिक सहभागाने मला आधार दिला आहे. तुमच्या सहानुभूतीसाठी आभार, ज्यामुळं मी अफवा आणि वाईट भावनांविरोधा उभी राहू शकले. ते म्हणतात की मझी काही प्रेमप्रकरणं होती, मला बाळ नको हवं होतं, मी संधीसाधू आहे आणि आता तर असंही म्हटलं जात आहे की अनेकदा माझा गर्भपातही झाला आहे. घटस्फोट ही अतिशय वेदनादायी प्रक्रिया आहे. मला एकटीला यातून सावरण्यासाठी वेळ हवा आहे. माझ्या चारित्र्यावर असा हल्ला करणं चुकीचं आहे. पण, मी वचन देते की यापैकी कोणत्याही गोष्टीला आणि कोणालाही मी माझं आत्मबळ तोडू देणार नाही.’

आपल्या खासगी आयुष्यावर होणारी ही चिखलफेक समंथालाही वेदना देऊन गेली. जीवनाच्या या टप्प्यावर काहींनी तिचं धाडस तोडण्याचा प्रयत्न करुनही समंथा मात्र या साऱ्यामध्ये खंबीरपणे उभी राहिली आहे.