मुंबई : महाराष्ट्रातून अनेक लोक आज कार्तिकी वारीनिमित्त पंढरपुरात गेले. कार्तिकी एकादशीनिमित्त अनेक लोक पदयात्रा करत तेथे पोहोचले. तसेच या निमित्तानं राज्यभरातून विठ्ठल - रुक्मिणी यांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचे वडील पंढरपुरात सेवा करत असल्याचे सांगितले आहे.
संकर्षणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये संकर्षणचे वडील सेवेत असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत संकर्षण म्हणाला, 'आज कार्तिकी एकादशी.. विठ्ठल विठ्ठल ... आमचे बाबा गेले 8/10 दिवस पंढरपूरी गेलेत.. सेवेला.. आता सेवा म्हणजे काय..? तर , तिथे जाउन निस्वार्थीपणे नेमून दिलेलं काम करणं.. पावत्या फाडणं .. भक्तांसाठी नियोजन करणं... गेली अन्नेक वर्षं , हजारो लोक हे करत आहेत.. पण मला आमच्या बाबांचं फार कौतुक वाटतं...', असं संकर्षण म्हणाला.
पुढे संकर्षण म्हणाला, 'स्टेट बॅंक ऑफ हैद्राबादमध्ये मोठं पद भूषवलेले, सगळं एैश्वर्य ऊभं केलेले, अनुभवलेले आमचे बाबा तिथे जाउन मस्तं भक्तं निवासमध्ये एका हॉलमध्ये राहातात, सतरंजी टाकून झोपतात, चंद्रभागेवर स्नानाला जातात .. विठ्ठल , पांडूरंग आपल्याला हेच सांगतो …. ; आपलं ते सगळं विसरून समरस होणे म्हणजे वारी...' (Actor Sankarshan Karhade Share Post On Social Media Talk About Father And Kartiki Ekadashi)
पुढे संकर्षण म्हणाला, 'म्हणुनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात; ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे.. तुटेल धरणे प्रपंचाचे .. एरवी सतत फोन करणारे आमचे बाबा गेल्या आठ दहा दिवसांत तिकडेच रमलेत.. आम्हालाच फोन करावा लागतो . . आणि फोनवर आता हॅलो नाही 'रामकृष्ण हरि' म्हणतात .. हे सगळं करायला वेगळीच ऊर्जा लागते .. खरंच .. अशी सेवा करणाऱ्या त्या सगळ्यांनाच, हा निस्वार्थ भाव शिकवणाऱ्या त्या वारिला .. आणि या सगळ्यांची वाट पाहात “युगं अठ्ठाविस” ऊभ्या असणाऱ्या त्या “पांडूरंगाला” दंडवत … '
दरम्यान, कार्तिकी वारीनिमित्त शासकीय पुजेचं आयोजन केलं. या पूजेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ही पूजा केली. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या वडिलांच्या सेवेबद्दल सांगितले आहे.