जेजुरी : संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर जाऊन दर्शन घेण्याची प्रथाच आहे. लग्नसोहळ्यानंतर नववविहात दाम्पत्यानं गड चढून मल्हारी मार्तंडाचरणी सेवा अर्पण करण्यालाही अनेकजण प्राधान्य देतात. (jejuri)
इथं मंदिरात येतेवेळी गडाच्या किमान पाच पायऱ्या तरी पतीनं पत्नीला उचलून घ्यावं आणि गड चढावा अशी प्रथा आहे. खंडेराया, म्हाळसा आणि बानूबाईचा वास असणाऱ्या याच गडावर दर्शनासाठी नुकताच एक लोकप्रिय अभिनेता पोहोचला होता.
काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या या अभिनेत्यानं जेजुर गडाच्या पायथ्याशी जाताच तिथं पत्नीला उचलून घेतलं आणि दर्शनासाठी तो पुढे सरसावला. त्यानं असं केलं, आणि या क्षणांचे काही व्हिडीओ समोर आले. खुद्द या अभिनेत्यानंही त्या वेळचा व्हिडीओ पोस्ट केला होता. (Suyash Tilak)
पत्नीसोबत खंडेरायांच्या दर्शनासाठी पोहोचलेला हा अभिनेता आहे, सुयश टिळक. त्यानं नुकतंच या ठिकाणाला पत्नी आयुषी हिच्यासोबत भेट दिली. जेजुरी गडावर झालेली भंडाऱ्याची उधळण, तिथलं संपूर्ण वातावरण थोडक्यात, संपूर्ण सोन्याची जेजुरी त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणली.
सुयशनं पोस्ट केलेल्या फोटोंना सर्वांनीच पसंती दिली. त्याच्या काही कलाकार मित्रांनीही त्याच्या पोस्टवर कमेंट केल्याचं पाहायला मिळालं.