गहनाची 'गंदी बात' चव्हाट्यावर; पॉर्न शूटिंग करताना रंगेहाथ अटक

गहना आणि वाद कायम

Updated: Feb 7, 2021, 06:33 PM IST
गहनाची 'गंदी बात' चव्हाट्यावर; पॉर्न शूटिंग करताना रंगेहाथ अटक

प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : मुंबई मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका बंगल्यामध्ये पॉर्न फिल्मचं चित्रिकरण सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला. ही फिल्म गहनाच्याच प्रॉडक्शन हाऊसतर्फे बनवली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. गहनासह अन्य आरोपींना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे,

चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून तरूण-तरुणींना पॉर्न इंडस्ट्रीच्या जाळ्यात ओढणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मढ येथील ग्रीन विला या बंगल्यामध्ये अश्लिल शूटिंग चालल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यावरून बंगल्यावर छापा टाकला. यावेळी अश्लिल दृष्याचं चित्रीकरण सुरूच होतं. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. यामध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठलादेखील होती. विशेष म्हणजे तीच या तथाकथित वेबसिरीजची मेकर असल्याचं समोर आलं आहे. तिच्यासह दोन अभिनेते, एक ग्राफिक डिझायनर  महिला, एक फोटोग्राफर आणि एका कॅमेरामनला अटक झाली आहे.

गहनानं एक प्रॉडक्शन हाऊस उघडलं होतं. त्याच्या माध्यमातून बॉलिवूडचं ऍट्रॅक्शन असलेल्या तरूण-तरुणींनी आपल्या जाळ्यात ओढायचं... प्रथम छोट्या सिरीज केल्यानंतर मोठ्या बॅनरचे सिनेमे मिळतील, असं आमिष दाखवायचं आणि अश्लिल दृष्य द्यायला लावायची, असा उद्योग सुरू असल्याचा आरोप होतोय. 'गंदी बात' या वेबसिरीजमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली गहना वसिष्ठ काही प्रथमच वादात अडकलेली नाही... 

कोण आहे गहना? 

गहनाचं खरं नाव आहे वंदना तिवारी... 
छत्तीसगडच्या चिमरी या गावात जन्मलेल्या गहनाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. 
2012मध्ये ती मिस एशिया बिकिनी स्पर्धेची विजेती झाली. 
तिनं आतापर्यंत 70 ते 80 जाहिराती केल्यात. 
दक्षिणेकच्या 30 सिनेमांमध्ये कामही केलंय. 
गेल्या वर्षी कमरेला तिरंगा लपेटून अश्लिल हावभाव करत फोटोशूट केल्यामुळे गहना वादात अडकली... यामुळे तिला मुंबईत मारहाणही झाली होती. त्यावर टीका झाल्यानंतर आपल्या मित्रानं व्हिडिओ चुकून अपलोड केल्याचं सांगत तिनं हात झटकले... हा पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका तेव्हा झाली होती. 
सोशल मीडियावर बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत राहण्याची खबरदारी गहना घेत असते...

या घटनेमुळे मायापुरी बॉलिवूडमध्ये किती बजबजपुरी आहे, हे पुन्हा एकदा समोर आलंय. सुपरस्टार होण्याचं स्वप्न बघणारे तरूण-तरूणी मुंबईत येतात आणि पॉर्न इंडस्ट्रीच्या दलदलीत रुततात. मायानगरीचं हे मायाजाल मोडून काढण्याचं आव्हान पोलीस आणि संबंधित यंत्रणांसमोर आहे. चंदेरी दुनियेला भुलणाऱ्या तरुणांनीही थोडं भान ठेवायला हवं.