आईवरुन शिवीगाळ केल्यामुळे मनोज मुंतशीर दुखावले! 'आदिपुरुष' वादानंतर केली मोठी घोषणा

Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir Post: मनोज मुंतशीर यांनीच आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लिहिले असून त्यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट करत संवादांवरुन सुरु असलेल्या वादासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सनातन धर्माचाही उल्लेख केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 18, 2023, 12:59 PM IST
आईवरुन शिवीगाळ केल्यामुळे मनोज मुंतशीर दुखावले! 'आदिपुरुष' वादानंतर केली मोठी घोषणा  title=
सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केलं मत

Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir Post:  'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यावरुन वाद सुरु आहे. या चित्रपटातील व्यक्तीरेखांबरोबरच या व्यक्तीरेखांच्या तोंडी देण्यात आलेल्या संवादांवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून यावरुन चित्रपट निर्मात्यांवर, संवाद लेखकावर आणि दिग्दर्शकावर टीकेची झोड उठली आहे. प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खानची (Saif Ali Khan) प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे संवाद लिहिणारे प्रसिद्ध संवाद लेखक, गीतकार मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आता चित्रपटाच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती मनोज मुंतशीर यांनीच दिली आहे. 

अनेक विषयांवर केलं भाष्य

मनोज मुंतशीर यांनी ट्वीटरवरुन एक दिर्घ पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी संवादांवरुन त्यांच्या आईचा उल्लेख करत करण्यात आलेला शिवीगाळ आणि वाईट शब्दांमध्ये उल्लेख केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आपली चूक झाली असेल असं म्हणताच असं असलं तरी माझ्याविरोधात एवढी कटूता का? असा प्रश्न विचारतानाच मी सनातन धर्मविरोधी असल्याचा शिक्का मारण्याची एवढी घाई का केली? असंही मनोज मुंतशीर यांनी चाहत्यांना विचारलं आहे. तसेच त्यांनी चित्रपटाच्या टीमने संवादांसंदर्भात घेतलेल्या एका निर्णयाचीही घोषणा केली आहे.

4 हजारांहून अधिक संवाद मी लिहिले पण...

"रामकथेमधून पहिली शिकवण घ्यायची झाली तर ती म्हणजे, सर्वांच्या भवनांचा सन्मान करा. ती भवाना चूक आहे की बरोबर हे वेळेनुसार बदलतं मात्र भावना कायम राहते. आदिपुरुष चित्रपटामधील 4 हजारांहून अधिक संवाद मी लिहिले आहेत. मात्र 5 वाक्यांनी काहींच्या भावना दुखावल्या. आता ज्या शेकडो वाक्यांमध्ये श्री रामांचं यश अधोरेखित केलं आहे, सीता मातेचं सतीत्वाचं वर्णन केलं आहे त्या वाक्यांसाठी कौतुकास मी नक्कीच पात्र होतो. मात्र असं झालं नाही," अशी खंत मनोज मुंतशीर यांनी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> "9500 रुपये देतो फक्त..."; 'आदिपुरुष'च्या टीमकडून प्रेक्षकांना धक्कादायक मेसेजेस! Screenshots आले समोर

आईचा उल्लेख आणि शिवीगाळ

"माझ्याच काही भावांनी (भारतीयांनी) माझ्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधानं केली. ही तीच लोक आहेत जी माझी आहे. त्यांच्या मातांसाठी मी टीव्हीवर अनेकदा कविता ऐकवल्या आहेत. त्यांनीच माझ्या आईबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. मी विचार करत राहिलो की, मतभेद असू शकतात. मात्र अचानक माझ्या भावांच्या मनात एवढी कटूता कुठून आली की ते प्रत्येक मातेला आपली माता मानणाऱ्या, माता कौशल्येच्या चरणांमध्ये बसल्याप्रमाणे शबरीच्या चरणाशी बसलेल्या प्रभू श्रीरामांना विसरले?" असा प्रश्न मनोज मुंतशीर यांनी उपस्थित केला आहे. 

'तेरी मिट्टी' आणि 'देश मेरे'ही मीच लिहिलं आहे

"3 तासांच्या चित्रपटामध्ये 3 मिनिटांचे संवाद मी तुमच्या कल्पनांपेक्षा फार वेगळे लिहिले असतील. मात्र तुम्ही यावरुन माझ्या कपाळावर सनातन धर्माविरोधात असल्याचं लिहून मोकळे झालात. एवढी घाई का केली, हे मला कळलं नाही. तुम्ही 'जय श्री राम' गाणं नाही ऐकलं का? 'शिवोहम' गाणं नाही ऐकलं का? 'राम सिया राम' नाही ऐकलं का? आदिपुरुषमधील सनातन धर्माचं कौतुक करणाऱ्या या ओळींचा जन्मही माझ्याच लेखणीमधून झाला आहे. 'तेरी मिट्टी' आणि 'देश मेरे' ही गाणीही मीच लिहिली आहेत," अशी आठवण मनोज मुंतशीर यांनी करुन दिली आहे.

नक्की वाचा >> 'आदिपुरुष'चे सर्व शो बंद पडणार? हिंदू समाजाच्यावतीने थेट हायकोर्टात याचिका

आपण एकमेकांविरोधात उभे राहिलो तर...

"मला तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही. तुम्ही माझे होतात, आहात आणि पुढेही राहणार आहात. आम्ही एकमेकांच्याविरोधात उभे राहिलो तर सनातन धर्म संपून जाईल. आम्ही आदिपुरुष सनातन सेवेच्या उद्देशाने बनवला आहे. हा चित्रपट फार मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे आणि यापुढेही पाहिला जाईल असा मला विश्वास आहे," असंही मनोज मुंतशीर यांनी म्हटलं आहे.

टीमचा मोठा निर्णय

"ही संपूर्ण पोस्ट करण्याचं कारण म्हणजे माझ्यासाठी तुमच्या भावनांहून मोठी कोणतीही गोष्ट नाही. मी माझ्या संवादांची पाठराखण करण्यासाठी असंख्य कारणं देऊ शकतो. मात्र त्यामुळे तुमचा त्रास कमी होणार नाही. मी आणि चित्रपटाचे निर्माते तसेच दिग्दर्शकांनी निर्णय घेतला आहे की काही संवादांचा प्रेक्षकांना त्रास होत आहे. आम्ही यामध्ये बदल करुन आणि याच आठवड्यात त्यांचा चित्रपटामध्ये समावेश करणार आहोत. श्री राम तुम्हाला सर्वांवर त्याची कृपा अशी ठेवो," असं पोस्टच्या शेवटी मनोज मुंतशीर यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> "मी हात जोडून माफी मागतो, मात्र..."; Adipurush मधील 'टपोरी' संवादांवरुन मनोज मुंतशीरचं विधान

यावर होता आक्षेप

या चित्रपटामध्ये हनुमानाबरोबरच अंगद आणि इतर पात्रांच्या तोंडी देण्यात आलेल्या संवादाची भाषा आक्षेपार्ह असल्याचं सांगत अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. याच नाराजीचा दखल आता चित्रपटाच्या टीमने घेतल्याचं मनोज मुंतशीर यांच्या या पोस्टवरुन स्पष्ट होत आहे.