दीपिका, प्रियांकामागोमाग आणखी एक अभिनेत्री लग्नासाठी सज्ज

ती या नात्याची अधिकृत घोषणा केव्हा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार

Updated: Nov 22, 2018, 01:01 PM IST
दीपिका, प्रियांकामागोमाग आणखी एक अभिनेत्री लग्नासाठी सज्ज

मुंबई : यंदाचं वर्ष हे सुरुवातीपासूनच खऱ्या अर्थाने लग्नसराईचं वर्ष आहे, असं म्हणायला हरकत नाही. लग्नसराईचे हे वारे थेट कलाविश्वापर्यंतही पोहोचले. सोनम कपूरपासून आता दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या लोकप्रिय अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. 

दीपिका पदुकोण हिने अभिनेता रणवीर सिंग याच्याशी लग्नगाठ बांधली. तर, देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्राही लवकरच अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

दीपिका, प्रियांका यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाविषयीची माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ती अभिनेत्री म्हणजे फ्रिडा पिंटो. 

ऑस्कर पुरस्कारावर आपली छाप पाडणाऱ्या Slumdog Millionaire या चित्रपटातील 'लतिका' या भूमिकेमुळे फ्रिडा प्रकाशझोतात आली होती.

'डीएनए'ने सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार फ्रिडा तिचा प्रियकर कोरी ट्रॅन याच्यासोबतच्या नात्याला आता वेगळ्या वळणावर नेत त्याच्याशी लग्न करण्याच्या विचारात आहे. 

'कोरीने तिला प्रपोज केलं असून दोघंही त्यांच्या नात्याकडे फार गांभीर्याने पाहात आहेत. पुढच्या वर्षी ते एका छोटेखानी विवाहसोहळ्याचा बेत आखत आहेत. फ्रिडाने कधीच तिचं नातं इतरांपासून लपवुन ठेवण्याचा प्रयत्न केलेला नसला तरीही विवाहसोहळ्याच्या बाबतीत मात्र ती फार काळजी घेताना दिसत आहे. किंबहुना हा सोहळा अगदी छोटेखानीच ठेवण्याला ती प्राधान्य देत आहे', अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सध्यातरी फ्रिडा किंवा तिच्या प्रवक्त्याकडून लग्नाच्या बातमीची अधिकृत घोषणा किंवा या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता ती या नात्याची अधिकृत घोषणा केव्हा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.