धक्कादायक : नाना पाटेकरांना #MeToo वादाचा मोठा फटका

नाना पाटेकर यांच्या टीमकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलंय

Updated: Oct 13, 2018, 02:16 PM IST
धक्कादायक : नाना पाटेकरांना #MeToo वादाचा मोठा फटका

मुंबई : #MeToo म्हणत अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांना नानांना मोठा फटका बसलाय. नाना पाटेकर आगामी सिनेमा 'हाऊसफुल ४'मधून बाहेर पडलेत. अक्षय कुमारचा मल्टीस्टारर सिनेमा 'हाऊसफुल ४' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लैंगिक छळाच्या आरोपांनंतर कालच या सिनेमातून काढता पाय घेतला होता. आता अशाच आरोपांमुळे नाना पाटेकर यांना या सिनेमातून बाहेर पडावं लागलंय.

नाना पाटेकर यांच्या टीमकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलंय. 'खोट्या आरोपांमुळे कुणालाही त्रास होऊ नये, अशी नानासाहेब यांची इच्छा आहे... याचमुळे त्यांनी आपला सिनेमा 'हाऊसफुल'पासून दूर होण्याचा निर्णय घेतलाय', असं यात म्हटलं गेलंय.

२००८ साली 'हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता.

दरम्यान, 'हाऊसफुल ४' या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक असलेल्या साजिद खाननं नैतिक जबाबदारी स्वीकारत या सिनेमातून काढता पाय घेतलाय. 'माझ्याविरुद्ध लावण्यात आलेल्या आरोपांनंतर कुटुंबीय, प्रोड्युसर आणि हाऊसफुल ४ च्या कलाकारांवर असलेल्या दबावामुळे मी माझी नैतिक जबाबदारी स्वीकारत या सिनेमाच्या दिग्दर्शनापासून स्वत:ला वेगळं करतोय. मी मीडियामध्ये असेलल्या माझ्या सहकाऱ्यांना केवळ इतकीच विनंती करतो की कृपया सत्य बाहेर येईपर्यंत कोणत्याही निर्णयावर पोहचू नका' असं साजिदनं म्हटलंय. साजिदवर अभिनेत्री सलोनी चोपडा हिनं लैंगिक छळाचा आरोप केला होता.