मुंबई : जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज अभिनेत्री ऐश्वर्या राय दिल्लीतील ईडी कार्यालयात हजार राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आधीच प्रश्नांची यादी तयार केली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत.
या सर्वांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. याबाबत कर अधिकारी तपासात गुंतले आहेत. पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. या प्रकरणी महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात पोहोचला होता.
महत्त्वाचं म्हणजे अभिषेकने ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच महानायक अमिताभ बच्चन यांनाही पनामा पेपर्स प्रकरणी ईडी नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावणार आहे.
बच्चन कुटुंबाचं नाव का प्रकरणात?
2016 मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे 11.5 कोटी कर कागदपत्र लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे.
एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. ऐश्वर्याला यापूर्वी एका कंपनीची संचालक बनवण्यात आले होते. त्यानंतर तिला शेअर होल्डर म्हणून घोषित करण्यात आलं. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होतं.
ऐश्वर्याशिवाय वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही कंपनी बंद पडली.