अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं नाव आता असेल...

९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.    

Updated: Oct 30, 2020, 08:54 AM IST
अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं नाव आता असेल... title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार स्टारर आणि राघव लॉरेंस दिग्दर्शित 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचं नाव एनवेळी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या नावावरून सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. अखेर चित्रपटाचं नाव बदलून ‘लक्ष्मी’ इतकंच ठेवण्यात आलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव हेतूतः 'लक्ष्मी बॉम्ब' असे ठेवले आहे. त्यामुळे  करणी सेनेने  'लक्ष्मी बॉम्ब' असं ठेवण्यात आलेल्या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला होता. शिवाय 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालण्याची देखील मागणी केली. 

श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव 'लक्ष्मी बॉम्ब' असं ठेवल्यामुळे हिंदू धर्मातील  देवदेवतांचा अपमान केला. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखाविल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. परिणामी चित्रपटाचे नाव बदलून 'लक्ष्मी' असं ठेवण्यात आलं आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एक भूताने पछाडलेल्याची भूमिका साकारत आहे. त्याच्यातील भूत तृतीय पंथीय असल्याचे भासते. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. 'लक्ष्मी' हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.