मुंबई : सलमान खानसोबत 'सुल्तान'.'टायगर झिंदा है' या दोन सुपरहिट चित्रपटानंतर 'भारत'चं आव्हान घेतलेल्या अली अब्बास जफरचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती त्याने ट्विटरवरून दिली आहे. काही दिवसांपूर्वी अनुपम खेर, त्यापाठोपाठ अभिषेक बच्चनचं ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. आता दिग्दर्शक अली अब्बास जफरचेही सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आहे.
अली अब्बास जफरचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. सोबतच अली स्नॅपचॅटवर नसल्याचेही त्यानं स्पष्ट केले आहे. माझ्या नावाचा वापर करून जर स्नॅपचॅटवर कोणतेही अकाऊंट असेल तर तो मी नसून कोणी हॅकर आहे. तुमचा दिवस चांगला जावो. असे त्याने ट्विट केले आहे.
Hack alert , someone hacked my Instagram account , sorting it out also I am not on Snapchat , so if someone uses Snapchat under my name is the hacker. Have a good day .
— ali abbas zafar (@aliabbaszafar) March 29, 2018
अली अब्बास जफर सध्या सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. 2019 च्या ईदला 'भारत' हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'भारत' हा दक्षिण कोरियन सिनेमा 'ऑड टू माय फादर' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे शूटिंग पंजाब, दिल्लीसोबतच अबुधाबी आणि स्पेनमध्ये होणार आहे. 'सुल्तान' आणि ' टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या बॉक्सऑफिसवरील सुपरहीट यशानंतर 'भारत' या सिनेमाकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांची अपेक्षापूर्ती करू शकेन का ? याचे दडपण असल्याचे अलीने काही दिवसांपूर्वी म्हटले आहे.
अभिनेता सलामान खान सध्या रेमो डिसुझा दिग्दर्शित 'रेस3' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये आहे. या सिनेमामध्ये सलमान खानसोबत जॅकलीन डिसुझा, डेजी शहा, बॉबी देओल, अनिल कपूर झळकणार आहे. 15 जून म्हणजेच यंदाच्या ईदला 'रेस 3' रसिकांच्या भेटीला येणार आहे.