मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका 'बालिका वधू' मालिकेत आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा सिकरी अशा कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांनी फक्त आपल्या कलेच्या जोरावर कलाविश्वात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. 70 ते 80 दशकात सुरेखा सिकरी यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानीत करण्यात आलं आहे. अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या सुरेखा सिकरी यांना अभिनेत्री नाही तर पत्रकार होण्याची इच्छा होती.
सुरेखा सिकरी यांचं संपूर्ण शिक्षण नैनीतालमध्ये झालं आहे. भविष्यात पत्रकार होण्याची त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या नशिबात काही वेगळचं लिहिलं होतं. त्यांच्या कॉलेजमध्ये एकदा नाटकाचं आयोजक करण्यात आलं. त्या नाटकाचं नाव होतं ' द किंग लियर' सुरेखा हे नाटक पाहाण्यासाठी पोहोचल्या. तेव्हा त्यांना उमगलं आपल्याला पत्रकार नाही तर अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.
कॉलेजमधील त्या एका नाटकाने सुरेखा सिकरी यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. त्यांनी 10 वर्ष रंगमंच गाजवलं. त्यानंतर त्यांनी 1978 साली प्रदर्शित झालेल्या 'किस्स कुर्सी' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पाहिलं नाही. यश मिळाल्यानंतर त्यांनी मुंबईत स्वतःचं घर खरेदी केलं.
अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्यासोबत होते खास संबंध
तसं पाहिलं तर बॉलिवूडमधील नात्यांचा फार गोंधळ आहे. फार कमी लोकांना नसीरूद्दीन शाह आणि सुरेखा सिकरी यांच्या खास संबंधाबद्दल माहिती आहे. नसीरूद्दीन शाह यांची पहिली पत्नी परवीन मुराद यांच्या बहिण आहेत सुरेखा सिकरी .
अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज निधन झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. सुरेखा दीर्घकाळापासून आजारी होत्या. त्या 75 वर्षांच्या होत्या.