अनुपम खेर यांनी शेअर केला भावूक करणारा व्हिडिओ!

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या चर्चेत आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेला 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Updated: Dec 31, 2018, 06:07 PM IST
अनुपम खेर यांनी शेअर केला भावूक करणारा व्हिडिओ! title=

नवी दिल्ली - ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या चर्चेत आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेला 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. त्यानंतर अनुपम खेर यांच्यावर सोशल मीडियावर सतत काही ना काही तरी वाचायला मिळते आहे. काही लोकांनी या चित्रपटावर जोरदार टीका केली. तर काहींनी थेट अनुपम खेर यांच्यावरही निशाणा साधला. काही प्रेक्षकांनी अनुपम खेर यांनी साकारलेल्या भूमिकेचे आणि त्यांच्या अभिनयाचे जोरदार कौतुक केले. अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका हुबेहूब वटवली असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खु्द्द अनुपम खेर यांनी सोमवारी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी १०१ वर्षांच्या एका आज्जीचा उल्लेख केला आहे. या आज्जीबाई या वयात चहा विकण्याचा व्यवसाय करतात.

व्हिडिओ शेअर करून अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, मी खजुराहोमध्ये हरबी देवींना भेटलो. त्या १०१ वर्षांच्या आहेत आणि आनंदी जीवन जगताहेत. इथल्या एका जुन्या झाडाखाली चहा विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. हरबी देवी खूप हिम्मतवान असल्याचेही ते व्हिडिओमध्ये सांगतात. हरबीदेवी यांनाही अनुपम खेर यांना भेटून मोठा आनंद झाल्याचे व्हिडिओमध्ये बघायला मिळते. एकूण १५ सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. 

'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट येत्या ११ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरून देशातील राजकीय वर्तुळातही वादळ उठल्याचे पाहायला मिळते. अनुपम खेर यांची पत्नी आणि खासदार किरण खेर यांनी चित्रपटातील अभिनयाबद्दल अनुपम खेर यांचे कौतुक केले. आतापर्यंत अनुपम खेर यांची ज्या चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ही भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस जेवढा या चित्रपटाचा विरोध करेल, तेवढी त्याची लोकप्रियता वाढेल, याकडेही किरण खेर यांनी लक्ष वेधले.