काय आहे द केरला स्टोरी? सांगतोय खुद्द A R Rahaman

A R Rahaman नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओत केरळमध्ये झालेली एक दुसरी बाजू दाखवण्यात आली आहे. द केरला स्टोरी हा चित्रपट आज 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकतात. 

दिक्षा पाटील | Updated: May 5, 2023, 12:46 PM IST
काय आहे द केरला स्टोरी? सांगतोय खुद्द A R Rahaman title=
(Photo Credit : Social Media)

A R Rahaman : सध्या चर्चेत असलेला The Kerala Story आज प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून चर्चेत होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी त्याच्यावर टीका केली. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या युथ लीग आणि काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI यांचा समावेश आहे. या चित्रपटाची कथा ही 30 हजार मुलींवर नाही तर केरळमधील 4 मुलींच्या आयुष्यावर आधारीत आहे. सोशल मीडियावर अनेक लोक आहेत जे या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत तर काही त्याच्या विरोधात आहेत. या सगळ्या वादात आता लोकप्रिय संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर केरळमधील एका मशिदीत झालेल्या हिंदू जोडप्याच्या विवाह सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

ए. आर. रहमाननं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सांगण्यात आले आहे की वधूच्या आईची परिस्थिती चांगली नसल्यानं त्यांना लग्नाचा खर्च करण शक्य नव्हतं. अशात केरळच्या अलप्पुझा शहरातील मशिदीत या जोडप्याच्या लग्नासाठी सोय करून दिली. इतकचं नाही तर त्यांनी वधूला सोनं देखील दिल्याचं म्हटलं जातं आहे. खरंतर ए. आर. रहमाननं शेअर केलेला हा व्हिडीओ 2022 चा आहे. मशिदीत लग्न करणाऱ्या या जोडप्याचे नाव अंजू आणि शरत आहे. अंजूच्या आईची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यानंतर तिने मशिदीच्या समितीकडे मदत मागितली आणि समितीनेही तिला मदत करण्याचे मान्य केले. मशिदीच्या समितीने या विवाहाची संपूर्ण तयारी केली. इतकंच काय तर हा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला. या लग्नात सुमारे 1 हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय या लग्नासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही फेसबुकवरून या जोडप्याचे अभिनंदन केले होते. 

हा व्हिडीओ शेअर करत ए. आर. रहमाननं 'शाब्बास. मानवतेवरचे प्रेम हे असंच बिनशर्त आणि सगळे घाव भरणारे असावे', असं कॅप्शन दिलं होतं. तर हा व्हिडीओ शेअर करत तो नेटकरी म्हणाला होता की 'ही पहा केरळची आणखी एक कहाणी.'

हेही वाचा : विकेंडला The Kerala Story पाहायचाय? तिकीट काढण्याआधी पाहा चित्रपटाचा Review

दरम्यान, हा चित्रपट आज 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात केरळमधील चार मुलींची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाला सगळीकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्यावर बंदी आणण्याची मागणी अनेक संस्थांनी केली होती. या चित्रपटाचं बजेट हे 30 कोटी होतं. तर चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धि इडनानी आणि सोनिया बलानी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.