Aryan Khan Drugs Case : ऐन सणासुदीच्या दिवसात शाहरुखवर ही काय वेळ? होणार इतकं नुकसान

शाहरुख आर्थिक आणि मानसिक अडचणीत... 

Updated: Oct 12, 2021, 01:34 PM IST
Aryan Khan Drugs Case : ऐन सणासुदीच्या दिवसात शाहरुखवर ही काय वेळ? होणार इतकं नुकसान  title=
शाहरुख खान

मुंबई : ‘झीरो’ या चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या अपयशानंतर शाहरुख जवळपास तीन वर्षांनी पुन्हा चित्रपटांमध्ये सक्रिय होत होता. शाहरुख एक लोकप्रिय चेहरा असल्यामुळे अनेक ब्रँड त्याच्यासोबत यंदाच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये जाहिरातीही करणार होते. पण, यादरम्यानच शाहरुखच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं ताब्यात घेतलं आणि सारी गणितं बदलली.

दीपिकासोबतच्या एका चित्रपटासोबतच दाक्षिणात्य दिग्दर्शकानंही शाहरुखसह सुरु असणाऱ्या चित्रपटांना ब्रेक लावला. एकिकडे आर्यन एनसीबीच्या ताब्यात असतानाच दुसरीकडे शाहरुखवर बंदी आणण्याचे हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागले आहेत. याच परिस्थितीमुळं बड्या ब्रँडनी शाहरुखसोबतचं काम थांबवलं आहे. ज्यामुळं त्याला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

सोशल मीडियावर होणाऱ्या विरोधानंतर 'Education Platform BYJU'नं शाहरुखसोबतच्या सर्व जाहिराती थांबवल्या आहेत. 2017 पासून शाहरुख बैजूजचा ब्रँड अँबेसेडर आहे. पण, तो ट्रोल होत असल्यामुळं हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जाहिराती आणि चित्रपट लहान मुलांवर थेट परिणाम करतात, ज्यामुळं हे निर्णय घेतले जात असल्याचं कळत आहे. विमल इलायची ब्रँडनंही त्यांची जाहिरात शाहरुखशिवायच चित्रीत केली. इतकंच नव्हे तर डी डेकॉर, बिग बास्केट, एलजी यांसारखे अनेक मोठे ब्रँड शाहरुखशी जोडले गेले होते ज्यांच्यासोबत तो या दिवसांमध्ये मोठं काम करण्याच्या तयारीत होता. पण आता सारंकाही संकटाच्या छायेत गेलं आहे.

साधारण एका ब्रँडच्या एंडॉर्समेंटसाठी शाहरुख 4 कोटी रुपये इतकं मानधन घेतो. काही ब्रँड्सनी शाहरुखला दरम्यानच्या काळात मोठी रक्कम देऊ केल्यामुळं या ब्रँड्सनाही नुकसानाचा सामना करावा लागत आहे. सध्या हे प्रकरण थंड होत नाही, तोवर कोणताही ब्रँड आणखी नुकसान झेलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे किंग खानला कोट्यवधींचा फटका बसला आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार शाहरुखचं वार्षिक उत्पन्न 5116 कोटी रुपये इतकं आहे. ज्यामदध्ये सध्याच्या परिस्थितीमुळे काही अंशी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.