मुंबई : हिंदी, मराठी गाण्यांप्रमाणेच इतर अनेक भारतीय भाषांमधील गाण्यांच्या असंख्य प्रकारांना आपलंस करून गाणारी एक गायिका म्हणजे आशा भोसले.
लावणीपासून भक्तीसंगीतापर्यंत सार्याच गाण्यांच्या प्रकारामध्ये त्यांचा आवाज अगदी चपखल बसतो. केवळ गायिका म्हणून अनेकांनी आशा भोसलेंना पाहिलं असेल पण एका संगीत कार्यक्रमामध्ये आशा भोसलेंनी स्टेजवर गाण्यावर ठेका धरत नृत्यही सादर केल्याचं फारच कमी रसिकांनी पाहिलं असेल.
काही वर्षांपूर्वी शूट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये झपाट्यानं व्हायरल झाला होता. वयाची ८०वर्ष पार केलेल्या आशा भोसलेंचा उत्साहही तरूणांना लाजवणारा आहे. एका पब्लिक शोमध्ये आशा भोसले 'आम्ही ठाकरं ठाकरं...' या गाण्यावर थिरकताना दिसल्या.
Watch a 80 yr old @ashabhosle shake a leg with such panache! What an amazing lady!! pic.twitter.com/d15tLj69A5
— Shefali Vaidya (@ShefVaidya) June 5, 2017
आशा भोसलेंचे बंधू हृद्यनाथ मंगेशकर संवादिनीवर साथ देत काही कोरस गायक गाणं गात होते. यावेळेस आशाबाईंनीही साडी खोचून या गाण्यावर ठेका धरला. त्यावेळी उपस्थितांनीही आशाबाईंच्या या प्रयत्नाला दाद दिली.
आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत. सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याचा 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' आशा भोसलेंच्या नावावर आहे.