महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर 'अशोक मा.मा' या मालिकेच्या माध्यमातून अशोक सराफ हे टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे 'कलर्स मराठी'च्याच 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकर देखील 'अशोक मा.मा' या मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमधील रसिका वाखरकरच्या अंदाजाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रसिका वाखारकर नेमकं काय म्हणाली?
'अशोक मा.मा.' या मालिकेबद्दल बोलताना रसिका म्हणाली, 'पिरतीचा वनवा उरी पेटला' ही आमची मालिका आणि माझं काम अशोक मामांना आवडायचं. पण आता 'अशोक मा.मा' या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. भैरवी हे पात्र मी साकारावं यासाठी मामादेखील खूप आग्रही होते. मामांसोबत कॅमेरा शेअर करताना एक जबाबदारीची जाणीव होते. मामा समुद्रासारखे सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. सेटवर त्यांनी अगदी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आहे. मामा आमच्या वयाचे होऊनच सेटवर वावरतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कसलंही दडपण येत नाही. मामांसोबत काम करणं हे माझ्यासाठी खूप काही शिकवणारं आहे. इतक्या मोठ्या कलाकाराच्या सानिध्यात आता आपल्याला राहता येणार आहे हीच माझ्यासाठी खूप भारी गोष्ट आहे'.
रसिका मालिकेत साकारणार ही भूमिका
रसिका पुढे म्हणाली की, 'अशोक मा.मा.' या मालिकेत 'भैरवी मुजुमदार असं माझ्या पात्राचं नाव आहे. अतिशय स्ट्राँग, स्वतंत्र, उच्चशिक्षित, मॉर्डन अशी ही मुलगी आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. आधी साकारलेल्या सावीपेक्षा अतिशय वेगळं पात्र मी साकारणार आहे. 'अशोक मा.मा.' या पात्रासोबत भैरवी वाद-विवाद घालताना दिसणार आहे. अर्थात त्यालासुद्धा तितकचं स्ट्राँग कारण आहे. वेगळी गोष्ट असणाऱ्या या मालिकेची प्रेक्षकांप्रमाणे आता मलाही उत्सुकता आहे'.
'अशोक मा.मा.' मालिका या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
'कलर्स मराठी'च्या 'अशोक मा.मा.' या मालिकेच्या माध्यमातून अशोक सराफ हे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. ही नवी मालिका 'अशोक मा.मा.', 25 नोव्हेंबरपासून रात्री 8.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.