'भावनेला भाषा नसते...', 'बाबा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'भावनेला भाषा नसते' अशा टॅगलाइन खाली साकारण्यात आलेला 'बाबा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

Updated: Jul 8, 2019, 05:34 PM IST
'भावनेला भाषा नसते...', 'बाबा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित title=

मुंबई : संपूर्ण कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या बापाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. कामाच्या जाळ्यात अडकलेल्या वडिलांचं प्रेम ओठांवर नसलं तरी, मनात कायम कुटुंबाची चिंता असते. 'भावनेला भाषा नसते' अशा टॅगलाइन खाली साकारण्यात आलेला 'बाबा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त मराठी कलाविश्वाकडे आपला मोर्चा वळवणार आहे. 

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची निर्मिती असलेल्या 'बाबा' चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स यांच्याबरोबर ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

'बाबा' चित्रपटाची कथा एका वडील व मुलाच्या सुंदर नात्याभोवती फिरताना दिसत आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे. ‘बाबा’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरला रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद लाभला होता. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला टीझर प्रकाशित केला आहे.

 ‘तनु वेडस मनू’ फेम अभिनेता दीपक दोब्रीयाल चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्याबरोबर नंदिता पाटकर स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे