विद्युत जामवालची 'या' प्रकरणातून निर्दोष सुटका

विद्युतवर २००७ मध्ये आरोप करण्यात आले होते.

Updated: Jun 17, 2019, 05:43 PM IST
विद्युत जामवालची 'या' प्रकरणातून निर्दोष सुटका title=

मुंबई : मुंबई मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने अभिनेता विद्युत जामवालला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने २००७ मध्ये झालेल्या एका हल्ल्याप्रकरणातून विद्युतची निर्दोष मुक्तता केली आहे. विद्युतवर २००७ मध्ये मुंबईतील जुहू येथे एका व्यक्तीच्या डोक्यावर काचेची बाटली फोडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अनेक वर्ष हे प्रकरण मुंबई मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट कोर्टात चालू होतं.

या प्रकरणी विद्युतचा मित्र हरीश नाथ गोस्वामीवरही आरोप लावण्यात आले होते. आज सोमवारी वांद्र्यातील कोर्टाने विद्युत आणि त्याच्या मित्रालाही या आरोपातून मुक्त केलं आहे.

विद्युवर गंभीररित्या एखाद्या व्यक्तीला जखमी करणे, दंगा करणे आणि बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे यांसारख्या गंभीर आरोपांप्रकरणी खटला सुरु होता. राहुल सुरी या व्यक्तीने विद्युत आणि त्याच्या मित्राने मारहाण केल्याचा आणि काचेची बाटली मारल्याचा आरोप केला होता. परंतु याप्रकरणी पोलिसांना कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच विद्युतच्या वकिलांनीही विद्युत निर्दोष असून त्याने सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केल्याचं म्हटलं आहे. 

विद्युतने त्याच्या करियरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली होती. परंतु त्याला बॉलिवूड चित्रपट 'कमांडो'मधून खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील विद्युतच्या अभिनयाची, त्याच्या मार्शल आर्ट्सची मोठी प्रशंसा झाली. आता लवकरच विद्युत 'कमांडो ३' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.