मुंबई : रानू मंडल हे नाव आज सर्वदूर पसरलंय. हिमेश रेशमियासह गाणं गायल्यानंतर रानू यांच्या गाण्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गात सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्ध झालेल्या रानू यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. पण रानू यांच्या आधी एका १३ वर्षांच्या मुलीनेही रेल्वे प्लॅटफॉर्म ते म्युझिक स्टूडिओपर्यंतचा प्रवास केला आहे. तिने अनुराग कश्यप यांच्या 'गँग्स ऑफ वासेपुर' चित्रपटात 'मेरा जूता फेक लेदर...' हे गाणं गायलंय.
दुर्गा असं त्या मुलीचं नाव आहे. ट्रेनमध्ये गाणी म्हणत दुर्गा आपल्या कुटुंबाचा गुजराण करत होती. एकदा फट फिश रेकॉर्ड्सचे आनंद सुरापुर यांनी दुर्गाच्या आवाजाने प्रभावित होत, तिला संगीत दिग्दर्शक स्नेहा खनवालकरकडे ऑडिशनसाठी पाठवलं.
स्नेहाला दुर्गाचा आवाज 'मेरा जूता फेक लेदर...' या गाण्यासाठी अतिशय योग्य वाटला. त्यानंतर केवळ १३ वर्षांच्या दुर्गाने अनुराग कश्यप यांच्या 'गँग्स ऑफ वासेपुर'मध्ये हे गाणं गायलं. दुर्गाने गायलेलं हे गाणं चांगलचं प्रसिद्ध झालं.
दुर्गा आंध्रप्रदेशमधून आलेली. ती कधी हिंदी गाणी ऐकतही नव्हती. पण तिला हिंदी चांगलं बोलता येत होतं आणि स्नेहाच्या मार्गदर्शनाखाली तिने आपलं टॅलेन्ट सर्वांसमोर आणलं. पण या गाण्याला आपला आवाज दिल्यानंतर आता मात्र दुर्वा बॉलिवूडपासून लांब आहे.