जयपूर : टेलिव्हिजनवरील रिऍलिटी शो 'बिग बॉस'मधून प्रसिद्धीझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी अनेकदा तिच्या काही ना काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा एका वादग्रस्त व्हिडिओमुळे पायलच्या अडचणी वाढल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील बूंदी पोलिसांनी पायलला अहमदाबादमधून अटक केली आहे..
पोलीस अधिक्षक ममता गुप्ता यांनी पायलच्या अटकेबाबत माहिती दिली. ममता गुप्ता यांनी पायल रोहतगीला अटक करुन तिला जयपूरला आणण्यात येत असल्याचं सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री पायल रोहतगीने नुकतंच, स्वतंत्र्य सेनानी पं. मोतीलाल नेहरु यांच्यावर टिपणी केली होती. त्यानंतर पायलवर बूंदी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय तिच्यावर इतर आरोपही करण्यात आले आहेत. अटक झाल्याची माहिती स्वत: पायलने ट्विटरवर ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
'मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडिओ बनवल्यामुळे राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. हा व्हिडिओ मी गुगलवरुन माहिती मिळवून तयार केला होता. बोलण्याचं स्वातंत्र्य हा विनोद झाला आहे' असं ट्विट करत, पायलने ट्विटरवर राजस्थान पोलीस, पीएमओ आणि गृहमंत्री कार्यालयाला टॅग केलं आहे.
I am arrested by @PoliceRajasthan for making a video on #MotilalNehru which I made from taking information from @google Freedom of Speech is a joke @PMOIndia @HMOIndia
— PAYAL ROHATGI & Team- Bhagwan Ram Bhakts (@Payal_Rohatgi) December 15, 2019