Body shaming वर प्रसिद्ध सिंगरकडून धक्कादायक खुलासा, माझ्यावरही...

लोकप्रिय गायिका बॉडी शेमिंगचा शिकार

Updated: Aug 9, 2021, 08:48 PM IST
Body shaming वर प्रसिद्ध सिंगरकडून धक्कादायक खुलासा, माझ्यावरही...
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉडी शेमिंग, मागील काही वर्षांपासून या शब्दाभोवती असणाऱ्या अनेक संकल्पना विविध कारणांनी समोर आल्या. कोणा एकाच्या शरीरावर केली जाणारी टीप्पणी, दिली जाणारी वर्तणूक आणि अनेक गोष्टींचा उल्लेख बॉडी शेमिंगबाबत बोलताना केला जातो. कलाकार मंडळीही याला चुकलेले नाहीत. किंबहुना त्यांनी या मुद्द्यावर अनेका खुलेपणानं भाष्य केलं आहे. 

गायिका नेहा भसिन ही त्यापैकीच एक आहे. नेहानं नुकतंच यासंदर्भातील खुलासा केला. कधी संकोच वाटेल अशा कमेंट्सचा सामना तुला करावा लागला आहे का, असा प्रश्न नेहाला विचारण्यात आला. त्यावर होकारार्थी उत्तर देत नेहानं काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. 

'हो अगदीच... एका मिटींगमध्ये टेलिव्हिजनवर माझ्य़ा पोटाभोवती वर्तुळ करण्यात आलं होतं. मी जाडी आहे (स्थूल) असं मला सांगण्यात आलं. ज्यामुळं व्हिडीओ रिलीज केला जाणार नाही असंही सांगितलं गेलं. त्यावेळी मी फक्त 49 किलो वजनाची होते. मी घरातून बाहेर पडले त्यावेळी अगदी सर्वसामान्य मुलगी होते. या गोष्टींबाबत मला केव्हाही संकोच वाटला नव्हता. पण, हे तर एक सुरुवातीचं उदाहरण होतं. अशा अनेक उदाहरणांवर तर मी पुस्तकच लिहू शकते.'

'फॅशन', 'लौंग गावाचा', 'धुनकी', 'जग घूमेया', 'हीरिये' आणि 'स्वैग से स्वागत' अशा अनेक गाण्यांसाठी आपला आवाज देणाऱ्या नेहानं कायमच तिच्या वेगळ्या अंदाजामुळे कलाविश्वात लोकप्रियता मिळवली आहे. ती सध्या बिग बॉस ओटीटीमध्ये झळकत असून, सध्या वूट अॅपवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येत आहे. ओटीटीच्या चार आठवड्यांनंतर हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर दाखवण्यात येईल.