मोदींना प्रश्न विचारणं स्वराला पडलं महागात

परखड मतं मांडणारी स्वरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Updated: Feb 28, 2019, 01:44 PM IST
मोदींना प्रश्न विचारणं स्वराला पडलं महागात title=

मुंबई : विविध विषयांवर आपली मतं परखडपणे मांडण्यासाठी काही कलाकार मंडळी ओळखले जातात. या कालकारांमध्ये समावेश होतो तो म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा. रुपेरी पडद्यावर नेहमीच चौकटीबाहेरच्या भूमिकांना न्याय देणारी ही अभिनेत्री चाहत्यांच्याही आवडीची असली तरीही सध्या मात्र तिच्या लोकप्रियतेला धक्का बसला आहे. याचं कारण ठरतंय तिने केलेलं एक ट्विट. 

भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर  हल्ला केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना या साऱ्याचं श्रेय देण्यात आलं. त्याविषयीची माहितीही अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. अशाच एका बातमीची लिंक स्वराने शेअर केली. पंतप्रधान मोदींनी कशा प्रकारे पाकिस्तानातील बालाकोट येथे कण्यात आलेल्या हल्ल्यावर नजर ठेवली होती याची माहिती त्या वृत्तात देण्यात आली होती. पण, हे तर त्यांचं कामच आहे. आता काय याचेही वेगळे गुण त्यांना मिळायला हवेत का? असा खोचक प्रश्न तिने ट्विटच्या माध्यमातून मांडला. 

काही महत्त्वाच्या मुद्द्यावर स्वराने मांडलेली मतं अनेकांना पटतातही. पण, देशातील एकंदर परिस्थिती पाहता तिचं हे ट्विट मात्र अगदी विसंगत असल्याचं नेटकऱ्यांना जाणवलं. ज्यामुळे तिच्यावर आगपाखड केली गेली. स्वराने हे ट्विट करताच मोदी समर्थन आणि इतरही काही नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं. कोणी याला ईर्ष्येचं नाव दिलं, तर कोणी मोदींची प्रशंसा करत स्वराला खडे बोल सुनावले. पार्टीची नशा हिच्यावरुन ओसरलेली नसावी, अगं बाई सुधर.... असं म्हणत तिला निशाण्यावर घेण्यात आलं. स्वराच्या या भूमिकेचा अनेकांना धक्काही बसला. देशात एका बाजुला तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असाताना दुसरीकडे स्वराचं हे असं ट्विट अनेकांच्या मनात तिच्या प्रती संतापाची भावना निर्माण करणारं ठरत आहे.