मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनच्या या काळात गरिब, हातावर पोट असणाऱ्या वर्गासाठी समाजातील अनेक स्तरांतून मदतीचा हात पुढे करण्यात आला. अगदी कलाकार मंडळीही यात माहे राहिली नाहीत.पण, मदतीचा हा ओघ सुरु असतानाच सोबत काही अफवांनाही वाव मिळाला. आर्थिक मदतीची आकडेवारी ही कल्पनेच्याही पलीकडे असल्याचं या अफवांतून भासवण्यात आलं.
आपल्याविषयीसुद्धा अशाच आशयाच्या अफवा सुरु असल्याचं पाहून 'परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान यानं ट्विटर अकाऊंटवरुन गव्हाच्या पोत्यातून पैसे वाटत फिरायला मी काही रॉबिन हूड नाही, अशा आशयाचं ट्विट करत या अफवांना पूर्णविराम दिला.
गेल्या आठवड्यापासून आमिर हा गरिबांना अन्ननाधान्य, गव्हाची पोती आणि त्यातून पैशांचीही मदत करत असल्याची तथ्यहीन माहिती प्रकाशझोतात आली. टीकटॉकवर सर्वप्रथम या साऱ्याची सुरुवात झाली. दिल्लीतील झोपडपट्टी क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांना आमिर १५ हजार रुपयांची रोख रक्कम असणारी पाकिटं देत असल्याचं यात म्हटलं गेलं होतं.
याचविषयी त्याने एक महत्त्वाचा खुलासा केला. 'मित्रांनो मी काही गव्हाच्या पोत्यांमध्ये पैसे ठेवणारा माणूस नाही. ही बातमीच पूर्णपणे खोटी आणि चुकीची आहे', असं ट्विट त्याने केलं. शिवाय त्याने या ट्विटच्या माध्यमातून सर्वांना सुरक्षित राहण्याचाही सल्ला दिला. आपल्याविषयीच्या चुकीच्या चर्चा आणि सध्याची एकंदर परिस्थिती पाहता आमिरने दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
Guys, I am not the person putting money in wheat bags. Its either a fake story completely, or Robin Hood doesn't want to reveal himself!
Stay safe.
Love.
a.— Aamir Khan (@aamir_khan) May 4, 2020
दरम्यान, पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये कोरोनाविरोधात सुरु असणाऱ्या संघर्षासाठी आमिरने यायपूर्वीच त्याचं योगदान दिलं आहे. शिवाय़ महाराष्ट्रातही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत त्याने आपली मदत दिली आहे. त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा', या चित्रपटासाठी रोजंदारी भत्त्यावर काम करणाऱ्यांसाठीही त्याने मदतीचा हात पुढे केला आहे. पण, पैसे वाटण्याची कोणतीही कृती त्याने केलेली नाही हेच खरं.