close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून ईशा अंबानीच्या लग्नात बिग बी वाढपी, अभिषेकने स्पष्ट केलं कारण

राजकारण, उद्योग, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी ईशाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

Updated: Dec 17, 2018, 09:44 AM IST
...म्हणून ईशा अंबानीच्या लग्नात बिग बी वाढपी, अभिषेकने स्पष्ट केलं कारण

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. ईशा- आनंदच्या विवाहसोहळ्याकडे फक्त साऱ्या देशाचच नव्हे, तर जगाचंही लक्ष लागलेलं होतं. प्री वेडिंग सोहळ्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेल्या या विवाहसोहळ्याचा थाट अनेकांनाच थक्क करुन गेला. 

राजकारण, उद्योग, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी ईशाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यापासून भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची उपस्थिती विवाहसोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरली. 

खऱ्या अर्थाने थाटात पार पडलेल्या या लग्नसमारंभात बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान यांनी एक वेगळी भूमिका निभावलीय ती भूमिका होती, वाढप्याची. पाहुण्यांच्या पंगतीत जेवण वाढत हे कलाकार मंडळी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून गेले. काहींनी  त्यांच्या या कृतीची प्रशंसा केली तर काहींनी मात्र त्याची खिल्ली उडवली. 

एका ट्विटर युजरने तर, बिग बी अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांनी इशाच्या लग्नसोहळ्याच वाढप्याचं काम का केलं, अशा आशयाचा एक प्रश्नही केला. ज्यानंतर खुद्द अभिषेक बच्चननेच पुढे येत या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

'सज्जन गोठ नावाची एक प्रथा आहे. ज्यामध्ये वधूचे कुटुंबीय वराच्या म्हणजेच नवऱ्या मुलाच्या कुटुंबीयांना जेवण वाढतात', असं लिहित त्याने बिग बी आणि आमिरच्या या भूमिकेविषयी स्पष्ट केलं. त्यामुळे अंबानी कुटुंबीय आणि कलाविश्वातील काही सेलिब्रिटींमध्ये असणारं नातं पाहताच हे क्षण ईशाच्या विवाहसोहळ्यात पाहायला मिळाले असं म्हणायला हरकत नाही.