'तान्हाजी'ची विक्रमी घोडदौड; मुंबईतील कमाईचे आकडे पाहून थक्कच व्हाल

'दबंग' खानलाही टाकलं मागे.... 

Updated: Feb 6, 2020, 07:00 PM IST
'तान्हाजी'ची विक्रमी घोडदौड; मुंबईतील कमाईचे आकडे पाहून थक्कच व्हाल
तान्हाजी, दबंग ३

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' Tanhaji या चित्रपटाने जवळपास महिनाभर बॉक्स ऑफिसवर असणारी भक्कम पकड कायम ठेवली आहे. तीनशे कोटींच्या कमाईचा आकड ओलांडत या चित्रपटाने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता या चित्रपटाने सलमान खान आणि अक्षय कुमार या दोन आघाडीच्या कलाकारांना मागे टाकलं आहे. 

सलमानच्या 'दबंग ३'ने आतापर्यंत २१७ कोटींची कमाई केली होती. तर, अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज' या चित्रपटाने ३०४ कोटींचा गल्ला जमवला होता. या दोन्ही चित्रपटांची कमाई सुरु असतानाच तान्हाजीने २०२० या वर्षात प्रदर्शित होत सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला या चित्रपटाच्या कमाईचे आकडे ३२४ कोटींचा आकडा ओलांडून त्यापुढे गेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं तान्हाजीची विक्रमी मालिका सुरुच असं म्हणायला हरकत नाही. 

अजय देवगन स्टारर य़ा चित्रपटाला मुंबईकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाने आतापर्यंत मुंबईतून १०४ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यालाच मागे टाकत आका तान्हाजीला मुंबईकर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यामुळे मुंबईतील कमाईने १३० कोटींचा आकडा ओलांडला आहे. येत्या काळात सलमानच्या 'दबंग ३' या चित्रपटाची मुंबईतील कमाईसुद्धा तान्हाजी सहज मागे टाकेल असंच चित्र दिसत आहे. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

'तान्हाजी'ची ही कामगिरी पाहता मायानगरी मुंबईवरही या चित्रपटाची छाप आहे, असं म्हणायला हरकत नाही. अजय देवगन, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर, देवदत्त नागे अशा कलाकारांच्या अभिनयाने सजलेला एक साहसपट तान्हाजीच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर उलगडला. काही ऐतिहासिक प्रसंगांचा संदर्भ या चित्रपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला, ज्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.