लॉकडाऊनमध्येच खिलाडी कुमारने गाठलं रुग्णालय....

तिच्यासाठी त्याने घेतला हा निर्णय.....   

Updated: Mar 30, 2020, 09:12 AM IST
लॉकडाऊनमध्येच खिलाडी कुमारने गाठलं रुग्णालय....
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Coronavirus मुळे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून संपूर्ण देशभरात अनेकांनीच याला प्रतिसाद देत कोरोनाविरोधातील लढा सुरु केला आहे. कलाकार मंडळींपासून ते अगदा सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. शक्य त्या सर्व परिंनी अनेकजण वैद्यकिय, आरोग्य क्षेत्रालाही हातभार लावत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावणारा असाच एक अभिनेता म्हणजे अक्षय कुमार.  

समाजोपयोगी कामांसाठी कायमच पुढाकार घेणाऱ्या अक्षय कुमार याने नाईलाजास्तव लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामागे कारणंही तसंच होतं. सहसा नियम मोडणाऱ्यांपैकी अक्षय कुमार नाही. पण, यावेळी त्याच्यावर वेळच अशी ओढावली की, त्याला थेट रुग्णालयच गाठावं लागलं.  

कारण, होतं ते म्हणजे पत्नी ट्विंकल खन्नाचं. खुद्द ट्विंकलनेच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओतून याविषयीची माहिती मिळाली. ज्यामध्ये मुंबईच्या मोकळ्या रस्त्यांवर कार घेऊन निघालेला खिलाडी कुमारही दिसत आहे. 

'रस्ते अगदी निर्मनुष्य आहेत. हा माझा थेट चाँदनी चौकमधून आलेला ड्रायव्हर.... आता आम्ही रुग्णालयातून घरी परतत आहोत. नाही नाही... मला कोरोना व्हायरस  नाही. लोकं रुग्णालयात अनेक कारणांसाठी जातात....', असं लिहित ट्विंकलने तिच्या पायाला दुखापत झाल्याचंही या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

 

सहसा मुंबईचे रस्ते असे निर्मनुष्य दिसतच नाहीत. अशा या रस्त्यांवर निघालेलं असताना ट्विंकलला साथ मिळाली ती म्हणजे तिच्या जोडीदाराची. संकट, अडचणीच्या वेळीसुद्धा प्रत्येक क्षणाचा आनंद घेणाऱ्या ट्विंकलचा हा अंदाज सोशल मीडियावर अनेकांचीच मनं जिंकत आहे.