नवी दिल्ली : भेssssssल वाला.... असा आवाज आला की अनेकांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आंबट, तिखट, गोड, चटपटीत आणि कुरकुरीत अशा विविध चवींची, विविधरुपी भेळ खाण्यासाठी सारेच पुढे येतात. भारतात प्रांताप्रमाणे भेळीचे प्रकार, तिची चव आणि तिची नावंही बदलतात. म्हणजे अगदी मुंबईच्या प्रसिद्ध अशा चौपाटी अर्थात समुद्रकिनारी मिळणारी 'भेळ' असो किंवा मग कोलकात्यामध्ये विकली जाणारी 'झालमुरी' असो. 'कम्फर्ट फूड' म्हणजेच परिपूर्ण आहार म्हणूनही अनेकजण या भेळीचा उल्लेख करतात.
भाज्या, चटण्या, पोहे, मुरमुरे यांची सुरेख सांगड घालत एक चवदार मिश्रण एका शंखू आकाराच्या कागदी पात्रात आपल्या हातात दिलं जातं. मैद्याच्या चपट्या पुऱ्या किंवा मग चमचाच्या सहाय्याने या भेळीवर ताव मारला जातो. अशी ही भेळ साहेबांच्या देशात म्हणजेच थेट इंग्लंडमध्येही विकली जात आहे बरं.
इंग्लंडमध्ये आणि भेळ....? पडला ना तुम्हालाही प्रश्न? सोशल मीडियावर सध्या अशाच एका अफलातून भेळवाल्याचा फोटो व्हायरल होत आहे. सुटबूटमध्ये, डोक्यावर अभिनेते देव आनंद यांच्यासारखी डोपी आणि चेहऱ्यावर सदैव हसू असणारा साहेबांच्या देशातील हा भेळवाला सध्या क्रिकेटच्या धामधुमीच्या वातावरणातही चर्चेत आहे. खुद्द बिग बींनीही त्याचा व्हिडिओ शेअर करत 'भेरी भेल डन' असं कॅप्शन त्या व्हिडिओला दिलं आहे.
bhery bhel done https://t.co/xMNpRT8ZCe
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 11, 2019
इंग्लंड आणि साऱ्या क्रीडा विश्वात सध्या उत्साह आहे तो म्हणजे क्रिकेट विश्वचषकाचा. याच वातावरणात भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा क्रिकेट सामना पार पडला त्यावेळी मैदानाबाहेर क्रीडारसिकांची भूक भागवण्यासाठी एक भेळवाला उभा असल्याचं पाहायला मिळालं. अनेकजण त्याच्याकडे मोठ्या कुतूहलाने जात होते, या अनोख्या कौशल्याची प्रशंसाही करत होते. भारतात ज्याप्रमाणे भेळवाले त्यांची सामग्री घेऊन भेळ विक्री करतात, त्याप्रमाणे आणि अगदी त्याच शैलीत हा परदेशी भेळवालाही अनेकांच्याच जीभेचे चोचले पुरवत आहे.