मुंबई : बऱ्याच राजकीय नाट्यानंतर अखेर महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार आलं. पाहता पाहता या सरकारच्या कामकाजाला अतिशय जोमानं सुरुवातही झाली. पण, आव्हानाची खरी परिस्थिती मात्र पुढं होती. कारण, वैश्विक महामारी असणाऱ्या कोरोना विषाणूचं संकट प्रशासनापुढं संकट होऊन उभं ठाकलं.
कोरोनाच्या संकटावर मात करत नाही तोच cyclone nisarga नैसर्गिक आपत्तीनंही महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांपुढं आणि मुख्यमंत्र्यांपुढं आणखी एक परीक्षा सुरु केली. या सर्व परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत ज्या संयमानं राज्याला आधार दिला आहे, याबाबतच त्यांचं कौतुक करणारं एक ट्विट अभिनेता अर्शद वारसीनं केल्याचं पाहायला मिळालं.
एका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ?
कौतुक म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या कामाची जणू त्यानं दखलच घेतली आहे, हेच त्याच्या ट्विटमधून स्पष्ट होत आहे. 'मला नाही वाटत की महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे यांनी) ज्याप्रमाणे कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सामना केला अशा आव्हानांना इतर कोणचेही मुख्यमंत्री सामोरे गेले असतील. ते आपल्या कार्यालयात स्थिरावले नाहीत तोच त्यांना मुंबईसारख्या या अतिशय वरदळीच्या शहरातून कोरोनाच्या वैश्विक महामारीचा सामना करावा लागला आणि आता त्यांच्यापुढं या चक्रीवादळाचं संकट...', असं ट्विट त्यानं केलं.
I don’t think any CM has had to face such huge challenges right at the start of his term, as the @CMOMaharashtra. He barely settled in his office & had to deal with global pandemic in a crowded city like Mumbai and now a cyclone...— Arshad Warsi (@ArshadWarsi) June 3, 2020
अर्शदनं हे ट्विट केल्यानंतर त्यावर अनेकांनीच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. शासनाविरोधात असणाऱ्यांनी त्याच्याविरोधात सुर आळवला. पण, समर्थन करणाऱ्यांनी आणि मुख्यमंत्रांच्या प्रयत्नांची दखल घेणाऱ्यांनी त्यांच्या कार्याला दाद दिली. सोशल मीडियावर अर्शदच्या या ट्विटची बरीच चर्चा झाली.