अरेरे, 'त्या' एका चुकीमुळे फरहान अख्तरच्या नाकीनऊ

कांस्य पदक जिंकल्यानंतर फरहाननं 'तुफान' वेगानं शुभेच्छा दिल्या 

Updated: Aug 5, 2021, 07:35 PM IST
अरेरे, 'त्या' एका चुकीमुळे फरहान अख्तरच्या नाकीनऊ
फरहान अख्तर

मुंबई : ऑलिम्पिक (olympic) खेळांमध्ये भारतीय हॉकी (indian Hockey Team) संघांनी दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. सुवर्णपदकानं संघाला हुलकावणी दिली असली तरीही भारताच्या पुरुष संघानं कांस्य पदकाची कमाई करत एक विक्रमच रचला. 

देशासाठी अत्यंत गौरवशाली अशी ही बाब ठरली. ज्यानंतर क्रीडा आणि इतर सर्वच क्षेत्रांतून पुरुष हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कलाकार मंडळीही संघाला शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत. शुभेच्छा देणाऱ्या कलाकार मंडळींमध्ये अभिनेता फरहान अख्तरही मागे नव्हता. 

पण, फरहाननं इथेच गोंधळ घातला आणि मग काय, नेटकऱ्यांनी त्याचीच शाळा घेण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर एखादी चूक झाल्यास ती सुधारेपर्यंत हजारोंच्या संख्येनं युजर्सनी ती पाहिलेली असते, तिचे स्क्रीनशॉटही निघालेले असतात. फरहानला याचा प्रत्यय आला असावा. जे पाहता चुकीला माफी नाही, याचा अनुभव त्याला इथं मिळाला असं म्हणायला हरकत नाही. 

कांस्य पदक जिंकल्यानंतर फरहाननं 'तुफान' वेगानं भारतीय पुरुष संघाऐवजी महिला हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या. बस्स, मग काय, त्याला सुधारत अरे लेका महिला नव्हे पुरुष संघ जिंकलाय असंच अनेकांनी त्याच्या लक्षात आणून दिलं. फरहाननं कालांतरानं आपलं हे ट्विट डिलीटही केलं. पण, उडायची ती खिल्ली उडवली गेलीच. 

भारतीय पुरुष हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी 
भारतीय हॉकी संघाने अटीतटीच्या सामन्यात जर्मनीचा पराभव केला. भारतीय हॉकी संघाला 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली. (Tokyo 2020 Men’s Hockey : India win first Olympic medal after 41 years) उपांत्य फेरीत भारताचा बेल्जियमकडून पराभव झाला होता. तर जर्मनीचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. या दोन्ही संघांमध्ये गुरुवारी कांस्यपदकासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. अखेर भारताने जर्मनीचा धुव्वा उडवत विजय मिळवत कांस्य पदकाची कमाई केली.