पत्नीसाठी रणवीरचं भावनिक पत्र, 'माझ्यासाठी दीपिका म्हणजे...'

तो चर्चेत आहे ते म्हणजे त्याने दीपिकासाठी लिहिलेल्या एका पत्रासाठी.   

Updated: Feb 4, 2019, 01:40 PM IST
पत्नीसाठी रणवीरचं भावनिक पत्र, 'माझ्यासाठी दीपिका म्हणजे...' title=

मुंबई : 'गोलियों की रासलीला- रामलीला' या चित्रपटाच्या सेटवर ओळख होण्यापासून ते अगदी लग्न होईपर्यंत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या नात्यात बरीच वळणं आली. या वळणांनी त्यांच्या नात्याचा बंध खऱ्या अर्थाने 

आणखी मजबूत आणि घट्ट केला. रणवीरने नेहमीच दीपिका आणि त्याच्या नात्याला सर्वांसमोर अगदी सुरेख पद्धतीने सादर केलं. असा हा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आता चर्चेत आहे ते म्हणजे त्याने दीपिकासाठी लिहिलेल्या एका पत्रासाठी. 

दीपिकाने वाढदिवसाच्या निमित्ताने तिची वेबसाईट सुरू करत चाहत्यांशी संपर्कात राहण्याच्या आणखी एका माध्यमाची निवड केली. ज्या वेबसाईटवरच रणवीरने त्याच्या पत्नीसाठी म्हणजेच दीपिकासाठी हे पत्र लिहिलं आहे. 'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या पत्राच्या, नोटच्या माध्यमातून त्याने एक व्यक्ती म्हणून दीपिका नेमकी आहे तरी कशी याविषयी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. तिच्या काम करण्याच्या पद्धतीपासून ते खासगी आयुष्यातील तिच्या प्रत्येक भूमिकेपर्यंत बऱ्याच गोष्टींवर रणवीर शब्दांच्या माध्यमातून व्यक्त झाला. 

दीपिकाविषयी रणवीर लिहितो.....

''आतापर्यंत मी ज्या व्यक्तींना भेटलो आहे, त्यांच्यात दीपिका ही सर्वाधिक असामान्य आणि प्रभावी व्यक्ती आहे. बरं, ती माझी पत्नी आहे म्हणून मी हे लिहितोय असं नाही. तिच्याविषयी लिहिणं हे माझ्यासाठी एक आव्हानच आहे. म्हणजे मला शब्दांची, भाषेची साथ असली तरीही हे माझ्यासाठी कठीणच. तरीही मी प्रयत्न करतो. 

मी असं म्हणू शकतो की तिच्यासाठी मी फार जवळचा व्यक्ती आहे. एक व्यक्ती म्हणून मी तिला फार चांगल्या पद्धतीने ओळखतोच पण, त्यासोबतच कामाच्या निमित्तानेही मी तिच्याशी जोडलो गेलो आहे. दीपिकाचं तिच्यातच एक वेगळं विश्व आहे. प्रेम, दया, प्रामाणिकपणा, जिद्द, बुद्धीचातुर्य, सौंदर्य, नजाकत आणि सहानुभूती या गोष्टींचं ते विश्व आहे. हेच घटक तिला एक खरी कलाकार म्हणून अनेकांपासून वेगळं आणि तितकच श्रेष्ठही ठरवतात.

थेट व्यक्त होणं कोणत्याही परिस्थितीचा धीराने सामना करणं हे सारं पाहता तिच्यामध्ये कमालीकी आंतरिक शक्ती आहे. तिची शिस्तप्रियता आणि विश्वासार्हता अतुलनीय आहे. त्यामुळे ध्येयवादी दीपिकाचा आदर केला जाणं हा तिचाच हक्क आहे. 

मी काही वेळेस तिची प्रशंसा करतो, दाद देतो कारण ती एक खास व्यक्ती आहे. मी या जगातील सर्वाधिक अभिमानी पती आहे. एक माणूस म्हणून सतत चांगल्या वाटेवर जाण्यासाठी ती मला वेळोवेळी प्रोत्साहित करते. माझ्या जगण्याला तिच्यामुळेच अर्थ प्राप्त झाला आहे. खऱ्या अर्थाने ती माझ्या जीवनात आलेला प्रकाशझोत आहे... "